नागपूर :- पृथ्वी विरुद्ध प्लास्टिकच्या लढ्यामध्ये मानवाची भूमिका महत्वपूर्ण आहे. छोट्या छोट्या कृतीमधूनही प्लास्टिकला मात दिली जाउ शकते. या लढ्यात सहभागी व्हा आणि २०४० पर्यंत प्लास्टिकला हद्दपार करण्याच्या लढ्यात जागरूकतेने सहभागी व्हा, असे आवाहन नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन फाउंडेशनद्वारे विश्व वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने करण्यात आले.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सोमवारी २२ एप्रिल रोजी सीताबर्डी येथे मनपा आणि ग्रीन व्हिजिलच्या वतीने जनजागृती करण्यात आली. दरवर्षी पर्यावरण संरक्षणासाठी समर्थन प्रदर्शित करण्यासाठी अर्थ डे (वसुंधरा दिवस) साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था अर्थ डे नेटवर्क द्वारे जागतिक स्तरावर समन्वयित केले जाते. ‘प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक’ ही यावर्षीच्या वसुंधरा दिनाची थीम होती.
आज अर्थ डे हा सर्वात मोठा नागरी उत्सव बनला असून जगातील १९५ देश आणि एक अब्ज नागरिक हा दिवस साजरा करतात. या मोहिमेला पुढे नेत अर्थ डे नेटवर्क इंडियाचे अधिकृत भागीदार म्हणून नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशन द्वारा नागपुरातील सीताबर्डी मार्केट परिसरात नागरिकांपर्यंत या दिवसाचे महत्व पोहोचविण्याची मोहीम राबविली.
प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक चा प्रचार करत ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सदस्यांनी दुकानदार, ग्राहक, नागरिकांना प्लास्टिकचे धोके, प्लास्टिक प्रदूषण, त्याचा पर्यावरण, मानव आणि प्राणी यांच्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली. रंगीत आणि सुचनात्मक फलक किंवा पोस्टरचा वापर करून प्लास्टिक प्रदूषणाला संपवणे व सिंगल यूज प्लॅस्टिकचा बहिष्कार करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. उपद्रव शोध पथक, मनपाचे अधिकारी आणि ग्रीन व्हिजिलच्या सदस्यांनी सीताबर्डी मार्केट येथे रॅली देखील काढली. या रॅलीमध्ये मानव आणि पृथ्वीच्या आरोग्यासाठी प्लास्टिक प्रदूषण संपविण्यासाठी कार्यवाही आणि प्रतिबद्धतेचे आवाहन करण्यात आले. २०४० पर्यंत संपूर्ण प्रकारच्या प्लास्टिकच्या उत्पादनात कमी करण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आले.
EarthDay.org च्या एशियाच्या प्रादेशिक संचालिका करुणा सिंह यांनी नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिलच्या वतीने शहरातील पर्यावरण रक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली मोहिमेदरम्यान उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे रोहिदास राठोड, शोधपथक प्रमुख वीरसेन तांबे, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सीताबर्डी मर्चंट असोसिएशनचे सर्वश्री किसन अग्रवाल, अनूप खंडेलवाल, विजय मेहाडिया, प्रदीप गुप्ता, शरद पारधी, किसन गंगवानी, अर्जुन भोजवानी आदी उपस्थित होते.
टीम लीड सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, तुषार देशमुख, दीपक प्रसाद, पार्थ जुमडे, नितीन कुकेकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी व उपद्रव शोध पथकाचे जवान यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
अर्थ डे का साजरा होतो?
१९६९ साली कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा येथे विनाशकारी तेल गळती झाली. या घटनेमुळे अमेरिकेचे माजी सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांच्या मनात एक अंतर्दृष्टी आणि चेतना विकसित केली. ज्याने अमेरिकेमध्ये एक चळवळ सुरू झाली, ज्यामुळे लाखो अमेरिकन लोक २२ एप्रिल १९७० रोजी रस्त्यावर उतरले. ज्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाचा निषेध करणारा पहिला वसुंधरा दिवस साजरा झाला.