– स्वागत कमानींनी सजले शहर..
बारामती :- पत्रकारांच्या न्याय्य हक्काचं व्यासपीठ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य शिखर अधिवेशन आजपासून बारामती येथे सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरी सज्ज झाली असून स्वागत कमानींनी शहर देखील सजले आहे.
राज्यभरातून येणाऱ्या हजारो पत्रकारांच्या निवास, भोजन व बैठकीची व्यवस्था देखील या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. बारामती करांच्या आदरातिथ्याचा परिचय या निमित्ताने राज्यभरातील पत्रकारांना होणार आहे.
१८-१९ नोव्हेंबरला बारामती येथे व्हॉइस ऑफ मेडिया चे राज्य शिखर अधिवेशन होऊ घातले आहे. यासाठी संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ ,समन्वयक मिलिंद संघई, जितेंद्र जाधव, विजय चोरडिया, सचिन मोहिते वरिष्ठ पदाधिकारी बारामती येथे तळ ठोकून आहेत.
शनिवारी दि. १८ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या भरगच्च मांदियाळीत हे अधिवेशन पार पडणार असून पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि एकंदरीत बाबींवर यावेळी चर्चा होणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ विचारवंत पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
—–
अशी असतील सत्रे…
राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने गदिमा सभागृह बारामती येथे १८, १९ नोव्हेंबरला दोन दिवसांमध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिले सत्र यामध्ये व्हाॅईस ऑफ मीडियाची कामगिरी, आगामी काळातील भूमिका, कार्य व जबाबदारी यावर चर्चा होईल. त्यानंतर दुपारी ११ ते २ उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम पार पडेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, खासदार हेमंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहतील. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, उपाध्यक्ष मंदार फणसे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, व बारामतीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांचे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महिलांचे पत्रकारितेतील स्थान, परिस्थिती आणि आव्हाने या विषयावर दुपारी ३ ते ४ या वेळेत होणाऱ्या सत्राला संघटनेच्या राष्ट्रीय संचालक संशोधन सल्लागार रेणुका कड, राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा, शैलजा जोगल, महिला प्रदेशाध्यक्ष सुकेशनी नाईकवाडे, चर्चा करणार असून याप्रसंगी त्यांना फराह खान बोलते करतील.
दुपारी ४ ते ६ या वेळेमध्ये ज्येष्ठ पत्रकारांना व संपादकांना जीवन गौरव व सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी मान्यवर संपादकांची प्रकट मुलाखत संजय आवटे घेतील. या कार्यक्रमाला देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ऑफ मीडिया जीवन गौरव व सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
जीवनगौरव पुरस्कारार्थी मध्ये पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या वतीने पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे मुद्रक प्रकाशक प्रवीण शिंगोटे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. याशिवाय जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, श्रीराम पवार, कुमार सप्तर्षी , नवाकाळच्या मुख्य संपादक जयश्री खाडिलकर, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, दैनिक ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांचा देखील याप्रसंगी गौरव करण्यात येणार आहे. याच सत्रामध्ये पत्रकारांसाठी योगदान देणारे डॉ. प्रदीप महाजन, धर्मवीर भारती व विजयकुमार यादव यांना विशेष सन्मान सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
——
उद्घाटन, शुभारंभ व प्रकाशन..
दरम्यान इंडिया पत्रकार नोंदणी कक्ष तसेच आंतरराष्ट्रीय नोंदणी शुभारंभ, व्हॉइस ऑफ मीडियाच्या तीन वर्षाचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या आढावा विशेषांक” आणि संदीप काळे लिखित “कोवळी पाने” या कवितासंग्रहाचे प्रकाशन देखील या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ ते ७ या सत्रामध्ये “पत्रकारितेमधील अस्वस्थता, पत्रकारिता बदनाम होण्यामागची कारणे आणि त्यावर उपाय” या विषयावर व्हॉइस ऑफ मीडिया मीडियाचे राज्य संघटक तथा अभ्यासक सुनील कुहीकर पत्रकारितेतील अभ्यासक मंदार फणसे, राज्य सरचिटणीस दुर्गेश सोना,र महाराष्ट्र राज्य समन्वयक संजय मिस्कीन हे विचार मांडणार असून या सत्राचे सूत्रसंचालन टीव्ही विंगचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे हे करणार आहेत. दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबरलाही रविवारी विविध कार्यक्रमांच्या आयोजनासोबतच बारामतीच्या विकास मॉडेलचा दर्शन दौरा निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे. समारोपी सत्र खासदार सुप्रिया सुळे पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
—
अधिवेशनाला येणाऱ्यांसाठी सूचना….
या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व पत्रकारांनी बारामती मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम गदिमा सभागृहात यायचे आहे. या ठिकाणी प्रत्येकाच्या निवास व्यवस्थेचे नियोजन व इतर सूचना यांना मिळणार आहेत. कुणीही घाई न करता वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.