– आरोपी बापलेक कोतवाली पोलिसांच्या सुपूर्द
-शेतीच्या वादातून भावाचा घेतला जीव
नागपूर :- शेतीच्या वादातून सख्या भावाची (मुलाच्या मदतीने) हत्या करून रेल्वेने पळून जाणार्या बापलेकास लोहमार्ग पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पकडले. सुरेश गहरे (55) त्यांचा मुलगा शुभम गहरे (25) रा. आकोट या दोघांना कोतवाली पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.
ज्ञानेश्वर गहरे (52), असे मृतकाचे नाव आहे. अकोट तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची मुलाच्या सहाय्याने हत्या केली. ज्ञानेश्वर हे शेतीत फवारणी करीत असताना त्यांचा मोठा भाउ सुरेश गहले व त्याचा मुलगा शुभम यांनी ज्ञानेश्वरला लोखंडी पाईप व कुर्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. मृतकाची पत्नी अर्चना गहरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकोट ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करीत आहेत.
दरम्यान घटनेनंतर आरोपींनी पळ काढला. दोघेही बाप लेक 18029 शालीमार एक्सप्रेसने पळून जात असल्याची गुप्त माहिती आकोट पोलिसांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि आरोपी बाप लेकांचे छायाचित्र व्हॉट्स अॅपवर दिले. त्यांच्याकडून पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना छायाचित्र मिळताच आरोपींचा शोध सुरू झाला. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शालीमार एक्सप्रेस नागपुरात आली. पोलिसांनी प्रत्येक डब्याची झाडाझडती घेतली. मात्र, दोघेही मिळून आले नाही. अखेर समोरील जनरल डब्याच्या खाली उतरुन नळावर पाणी पित असताना मिळून आले. ओळख पटल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी नंतर कोतवाली पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सरवदे, उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, पोलिस हवालदार संजय पटले, पप्पु मिश्रा, बुरडे, हिंगणे, त्रिवेदी आणि प्रवीण खवसे यांनी केली.