संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेतकरी मशागतीचे कामे आटोपून खरीप हंगामाकरिता सज्ज झाला असून बी बियाणे खरेदीची तजवीज करताना दिसून येत असून काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यात सज्ज झाला आहे.
ट्रॅक्टर किंवा त्यांनी त्यांच्या बैलजोडीने नांगरणी,वखरणी केली त्याचबरोबर शेतात असलेले तन, कचरा कपाशीच्या काड्या साफ करण्याचे काम त्याचबरोबर तुरीचे फन तसेच सर्व शेतातील असलेले कामे मे महिन्यात आटोपून त्यापासून खत निर्माण करण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांकडून केल्या गेला आहे.काही शेतकऱ्यानी बैलजोडी किंवा ट्रॅक्टर भाड्याने घेऊन शेतीची पूर्णता मशागत केली आहे आता शेतकरी राजा पेरणीसाठी सज्ज आहे त्यासाठी त्यांनी उन्हातानातून राबून डोक्यावर ऊन झेलत व घामाच्या धारा अंगारून वाहत तो आता काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यात आतुर झाला आहे.दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या लप्या छुपीच्या खेळामुळे शेतकरी दरवर्षी डबघाईस आला असताना याहीवर्षी तरी उत्पादन चांगले होईल या आशेने तो पुन्हा शेतात पेरणी ला लागणारी बियाणे लक्षात घेता खरिपात करिता घरच्या लक्ष्मीचे दागिने तर गहाण ठेवावे लागणार नाही ना अशीही शंका त्याला मोठ्या प्रमाणात सतावत आहे.काळ्या आईच्या कुशीतून निघणाऱ्या पिकांच्या भरवशावर त्यांच्या संसाराचा गाडा चालू असतो बियाणे खरेदीस जेव्हा जातो तेव्हा कृत्रिम टंचाई निर्माण करून त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळण्यात येते. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर आतापर्यंत शेतकऱ्यांचा माल घरातच साठवून होता तसेच शेतात भाजीपाला किंवा इतर पिकानाही मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी या ना त्या कचाट्यात अडकला असतो त्यामुळे शासनाने प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.