बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

पंढरपूर :- “गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा”, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व  अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार हरिभाऊ बागडे, बबनराव पाचपुते, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, पृथ्वीराज देशमुख, सुनील कांबळे, गोपीचंद पडळकर, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

“अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. हा सोहळा वृद्धिंगत व्हावा, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे”, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहीत केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल”.

नामदेव पायरी ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार व नामदेव पायरीचा विकास प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल आणि आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आणि भाविक पंढरीत येतील तेव्हा त्यांना हा बदल दिसेल, असा विश्वास व्यक्त करून पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊ या व भागवत धर्माची परंपरा, वारकरी प्रथा – परंपरा, भक्तीभाव पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करूया, असे ते म्हणाले.

साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी

शिरोडी खुर्द (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे हे दांपत्य मानाचे वारकरी ठरले. त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपूर्द करण्यात आला. साळुंखे समाज कल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, ते पन्नास वर्षापासून वारी करत आहेत.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व लोकप्रतिनिधी व प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समिती सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या वेलफेअर फाऊंडेशनच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथेवर आधारित ॲनिमेटेड फिल्मचे तसेच मंदिर समिती दैनंदिनी व श्रींच्या पुरातन अलंकारांच्या अल्बमचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी बालवारकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज यांनी केले. तर आभार विनया कुलकर्णी यांनी मानले.

श्री संत नामदेव महाराज वाड्याला भेट आणि दर्शन

श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी श्री संत नामदेव महाराज वाड्यात जाऊन दर्शन घेतले. मंदिर समितीच्यावतीने यावेळी त्यांचा पगडी व शाल देऊन तर अमृता फडणवीस यांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘आळसी ऑफ द इयर’ पहायचा असेल तर मातोश्रीवर जा, नवनीत राणांचे ते शब्द काय?

Fri Nov 4 , 2022
अमरावती :- तुम्हाला सर्वात आळशी माणूस पहायचा असेल तर तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या एका वक्तव्यानंतर नवनीत राणांनी हे प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणांनी त्यांना सर्वात आळशी माणूस पहायला तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, या जहरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com