संभाजी नगर “आरक्षित जागा” म्हणून नोंद कुणी केली?
मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समितीची दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्याची मागणी
नागपूर :- महादूला नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते केले. त्याप्रसंगी बोलतांना बावनकुळे नी संभाजी नगर सह नगरपंचायत मधील सर्व झोपडपट्टी परिसरातील रहिवासी नागरिकांना मालकी हक्क पट्टे वाटप करण्याचे आदेश दिले. संभाजी नगर, जयभीम नगर, सिद्धार्थ नगर व फुले नगर परिसरातील लोकांनी मालकी हक्क पट्टे वाटप फॉर्म भरून सोबत १०० रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा, नगरपंचायत कडून प्रत्यक्षात जागेची मोजणी यासह सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु अजूनही संभाजी नगर व जयभीम नगर मधील कुणालाही जागेचे पट्टे वाटप झालेले नाही. मतदार राजा आहे. त्याचा सन्मान करणे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले.
महादूला नगरपंचायत प्रशासनाने २०१८ पासून जाणीवपूर्वक संभाजी नगर व जयभीम नगर वरील झोपडपट्टी वासीयांवर अन्याय केला आहे. येथील नागरिकांनी सामूहिकपणे नोंदणीकृत मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समितीच्या माध्यमातून मालकी हक्क पट्टे वाटप कार्यक्रम राबविण्यासाठी मोठा लढा उभारला होता. मोठी आंदोलने केली. त्याला यशस्वी स्वरूप प्राप्त झाल्यावर विद्यमान आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांचा १० नोव्हेंबर २०१८ रोजी लोकवर्गणीतून भव्य दिव्य जाहीर सत्कार सोहळा संपन्न केला होता. त्यानंतर लागलेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत निवडणुकीत समस्त लोकांनी पाठिंबा दिला. २०१९ मधील महत्वपूर्ण नगराध्यक्ष निवडणुकीत उमेदवार विजयी करण्यात येथील मतदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वेळोवेळी बावनकुळे नी पट्टे वाटप करण्याचे आदेश दिले. पण मागील चार वर्षांपासून महादूला नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मालकी हक्क पट्टे वाटप कार्यक्रम संभाजी नगर व जयभीम नगर च्या नशिबी आला नाही. त्यातून पूर्णपणे विकास रखडला. ही मोठी शोकांतिका आहे. असे भूषण चंद्रशेखर यांनी सांगितले.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन प्रसंगी लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या पट्टे वाटप आदेशातून नवचैतन्य व आनंददायी वातावरण संभाजी नगर, जयभीम नगर मधील नागरिकांमध्ये संचारले, त्यातून त्यांनी महादूला नगर पंचायत प्रशासनाशी पुन्हा एकदा संपर्क केला पण यावेळी अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी २०१९ महादूला नगरपंचायत आराखडा मध्ये संभाजी नगर व जयभीम नगर चा समावेश ‘आरक्षित जागा’ म्हणून दर्शविल्याने पट्टे वाटप प्रक्रिया राबविण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील नागरिकांची मालकी हक्क पट्टे वाटप प्रक्रिया रेंगाळणार असे चित्र दिसत आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्याने प्रस्ताव सादर करून तो पुणे येथील शासकीय कार्यालयाकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्यास पट्टे वाटप करण्यास सोयीस्कर होईल. आराखडा दुरुस्ती करीता महादूला नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समितीकडून दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) कडून संभाजी नगर,जयभीम नगर,सिद्धार्थ नगर व फुले नगर मधील नागरिकांच्या विकासाकरिता १३.५५ हेक्टर जागेचा पट्टा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्याची ७/१२ प्रत नागरिकांच्या घरोघरी जाऊन वाटली. यानंतर महादूला नगरपंचायत आराखडा मध्ये “आरक्षित जागा” म्हणून या जागेची नोंद झाली कशी? हा प्रश्न निर्माण होतो. लोकांच्या हिताकरिता निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मतदारांच्या समस्या, प्रश्न सोडविणे, त्याकरीता लढा उभारणे व त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणारे पाहिजे. येणाऱ्या २०२४ च्या नगरपंचायत निवडणुकीत लोकांनी पूर्णपणे यावर चिंतन व मनन करून निर्णय घेतला पाहिजे.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांनी केले आहे.
८० टक्के समाजकारण अशी प्रतिमा असणाऱ्या नगराध्यक्षांना आम्ही समितीकडून आरक्षित जागा म्हणून नोंद असलेल्या २०१९ च्या आराखड्यात दुरुस्ती करण्याची मागणी केलेली आहे. ते ती पूर्ण करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
-राष्ट्रगण भीमराव चंद्रशेखर सचिव, मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समिती, महादूला.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातील लोकांना आनंद झाला. त्यांचा मान सन्मान टिकवण्याची भूमिका नगरपंचायत प्रशासनाने हाताळावी.
– उषा रघुनाथ शाहू
अध्यक्ष, कामठी-मौदा विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चार वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून झालेल्या जाहीर सत्कार समारंभात माजी मंत्री बावनकुळे नी पट्टे वाटप करा आदेश दिला. पण नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. ही मोठी आश्चर्यकारक बाब आहे.
– मनोज विरघट रहिवासी, जयभीम नगर, महादूला न.पं.
दिलेला शब्द पाळणारा निष्ठावान नेता म्हणून बावनकुळे ची प्रतिमा राज्यात आहे. त्याला कलंकित करण्याचा डाव नगरपंचायत प्रशासनाने करू नये.