प्रदेश युवक काँग्रेसच्या शिबिरात मार्गदर्शन
नागपूर – सांप्रदायिक शक्तीकडून जात,धर्माच्या नावाखाली देश तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना हा देश अखंडित ठेवण्याची जबाबदारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर जिल्ह्याच्या पेंच सिल्लारी येथे आयोजित “लक्ष्य २०२२” या तीन दिवसीय निवासी शिबिरात ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंग चुडामस, सहप्रभारी प्रदीप सिंधव, विजयसिंह राजू, प्रियंका सानप, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व राजस्थानचे राज्यमंत्री सीताराम लांबा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आदी उपस्थित होते.
बी. व्ही. श्रीनिवास म्हणाले, महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघटनेतील नियम व अनुशासनाचे पालन करून पुढील आव्हानांसाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
युवक काँग्रेसने देश व समाजाच्या विकासासाठी आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. आगामी निवडणुकांची तयारी, प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमांची हाताळणी याबद्दलही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे ध्वजारोहण आणि सर्वधर्म प्रार्थना घेण्यात आली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस सीताराम लांबा यांनी “भारत निर्माण की कहाणी” या विषयावर मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेस पक्षाचे योगदान याबाबतही त्यांनी विस्तृत माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी समन्वय साधण्याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. काँग्रेस आणि देशाच्या इतिहासाविषयी प्रश्न विचारून बरोबर उत्तर देणाऱ्या कार्यकर्त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. पार्थिव राज कटवारिया, सौरभ शर्मा, सुमीत वशिष्ठ आदी वक्त्यांनी कार्यकर्त्यांना यथोचित मार्गदर्शन केले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शरण पाटील, अनिकेत म्हात्रे, सोनललक्ष्मी घाग, दीपाली ससाणे, शिवानी वडेट्टीवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.