– माधव भांडारी यांच्या अयोध्येवरील ग्रंथाचे प्रकाशन
नागपूर :- अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माण ही सर्व भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. अयोध्येचा संघर्ष मंदिर निर्माणासोबतच भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनाचा देखील संघर्ष होता. कारण अयोध्या हे भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
अयोध्या संघर्षाचे अभ्यासक आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘अयोध्या’ या मराठी ग्रंथाच्या ‘अयोध्या – जो कभी पराजित नहीं हुई’ या हिंदी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांत शाखेद्वारे शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री डॉ. पवनपुत्र बादल, संघटन मंत्री नितीन केळकर, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, लखनसिंह कटरे, अविनाश पाठक, नरेश सबजीवाले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘अयोध्येच्या संघर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी मोठे योगदान दिले. श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे त्यांनी समर्थन केले. त्यानंतर हा मुद्दा संपूर्ण देशाच्या मुख्य अजेंड्यावर आला. पुढे विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल, उमा भारती, साध्वी ऋतंभरा यांच्यासह अनेकांनी मोठा संघर्ष केला. प्रभू श्रीराम भारतीयांचे दैवत आहे आणि आपल्या दैवताचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या अयोध्येत त्यांचे मंदिर होऊ नये तर कुठे व्हावे? हे जन्मस्थान भारतीयांच्या अस्मितेचा विषय आहे. हा जातीय किंवा धार्मिक मुद्दा मुळीच नाही.’ या पुस्तकातून अयोध्येचा संघर्ष भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचणार आहे. पण तो डिजीटल माध्यमातून पोहोचले तर अधिक संयुक्तिक ठरेल, अशी अपेक्षाही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली. माधव भांडारी हे एक चिंतनशील व्यक्तिमत्व असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.