– मिलिंद कीर्ती यांचा मुंबई मराठी साहित्य संघातर्फे गौरव
नागपूर :- मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पत्रकार व लेखक मिलिंद कीर्ती यांना २०२३चा रा.भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार दुबई येथील प्रसिद्ध उद्योजक धनंजय दातार यांच्या हस्ते देऊन त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मिलिंद कीर्ती यांनी हा पुरस्कार इस्त्राईल व पॅलेस्टाईन यांच्या युद्धात मारले गेलेले निष्पाप २ हजार बालके व मणिपूर हिंसाचारात मरण पावलेल्या महिलांना समर्पित केला.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या ८८ व्या वर्धापनदिन सोहोळ्यात साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी दुबई येथील अल-अदिल उद्योग समूहाचे अध्यक्ष धनंजय दातार, साहित्य संघाच्या अध्यक्षा अचला जोशी, कार्याध्यक्षा प्रा.उषा तांबे, साहित्य शाखा कार्यवाह अशोक बेंडखळे, प्रमुख कार्यवाह अश्विनी भालेराव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी धनंजय दातार यांना मराठी यशवंत पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रतिभा रत्नाकर मतकरी यांना सहचारिणी पुरस्कार, मिलिंद कीर्ती यांना रा.भि.जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार, अनुराधा कुलकर्णी यांना चंद्रगिरी पुरस्कार आणि विजयराज बोधनकर यांना चित्रकार-साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा. नरेंद्र पाठक संपादित साहित्य दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन अध्यक्षा अचला जोशी यांनी केले. प्रमुख कार्यवाह अश्विनी भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन चित्रा वाघ यांनी केले.