– तृतीय क्रमांकाचे दोन पुरस्कार प्राप्त
चंद्रपूर :- केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०२३-२४ वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील ३३ महापालिका व नगरपालिकांचा ‘स्पार्क अवॉर्ड-२०२४’ (सिस्टमैटीकल रिअल टाइम रैंकिंग) देवून गौरव करण्यात आला. यात चंद्रपूर महानगरपालिकेने उत्कृष्ट स्थानीक स्वराज्य संस्था म्हणुन तृतीय क्रमांक व नावीन्य शहर स्तर संघ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल देशात तृतीय क्रमांक असे दोन पुरस्कार पटकाविले.
३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिका गटात चंद्रपूर महापालिका देशात तिसऱ्या स्थानी आहे.त्याचप्रमाणे बेस्ट डेव्हलपमेंट पार्टनर या वर्गात नावीन्य स्तर शहर संघ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल मनपाने देशात तृतीय क्रमांक मिळविला आहे. दिल्ली येथे गुरुवार १८ जुलै रोजी सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. इंडिया हॅबिटॅट सेंटर स्टीन ऑडिटोरियम येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरीमंत्री मनोहर लाल, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम यांचाही सन्मान करण्यात आला.
या अभियानांतर्गत मनपातर्फे १२०० महिला बचतगट तयार करण्यात आले असुन ७०० लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले. त्याचप्रमाणे ६ हजार लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले असुन बेघर व्यक्तीसाठी १ बेघर निवारा केंद्र उभारण्यात आले. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत महापालिकेला ६४०८ लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट प्राप्त होते. उद्दिष्टापेक्षा ज्यास्त असे ९३०० कर्ज प्रकरणे बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली.मनपातर्फे ७३०० पथविक्रेत्यांना कर्ज वितरित करण्यात आले.
वॉर्ड सखी या नाविन्यपूर्ण संकल्पनेला नाविन्य शहर स्तर संघाच्या माध्यमातून राबविले जात असुन या उपक्रमाच्या माध्यमातून मनपा आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून वॉर्ड सखी काम करीत आहेत. शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच मनपाकरीता कर देयक वाटप, पाणी पट्टी देयक वाटप करणे,निवडणुकीसंबंधी कामे,आरोग्य संदेश देणे इत्यादी कामे सुद्धा घरोघरी पोहचुन केली जात आहेत.या पुरस्कार सोहळ्यास केंद्रीय नगर विकास विभागाचे सचिव अनुराग जैन, केंद्रीय संचालक राहुल कपूर, संचालक मनोज रानडे, नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशीला पवार, सहआयुक्त शंकर गोरे उपस्थित होते.