नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेसह (भित्तीचित्र स्पर्धा) स्वच्छ सर्वेक्षणावर आधारीत विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राजे रघुजी भोसले नगरभवन ( टाऊन हॉल), महाल येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी स्पर्धकांनी वेळेवर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निमशासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचे (wallpainting competition)आयोजन करण्यात आले होते. मनपाच्या या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेच्या माध्यमातून नागपूर शहराचा समृद्ध असा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा वारसा चित्रस्वरुपात जतन करण्याचे कार्य करण्यात आले आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर शहरातील विविध इमारतींच्या कुंपण भिंतींना चित्रकारांनी अधिक सुशोभित करून दाखविले आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील इमारतीच्या भिंतींवर नागूपरचा समृद्ध असा कलेचा वारसा झळकत आहे.
मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेत ६०३ हुन अधिक चित्रकारांनी शहर सौंदर्यीकरण च्या उद्देशाने कुंपण भिंतींना नाविन्यपूर्ण लूक देण्यासाठी कार्य केले. या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेत ५१५ महाविद्यालयीन विद्यार्थी गट आणि ८७ व्यावसायिक चित्रकार सहभाग नोंदवीत शहरातील इमारतींचे सौदार्यीकरण केले. या चित्रकारांना स्वच्छ भारत अभियानावर आधारित ३२ विषयाला अनुसरून शासकीय व निमशासकीय इमारतींच्या भिंतीवर चित्र काढले होते. याशिवाय मनपाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण यावर आधारीत विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे पुरस्कार देखील सदर कार्यक्रमात वितरित केल्या जाणार आहेत. तरी स्पर्धकांनी वेळेवर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहेत.