‘अश्वमेध महायज्ञ’ हा केवळ धार्मिक विधी नसून,याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा प्रभाव आहे – राज्यपाल रमेश बैस

नवीमुंबई :- आपले पर्यावरण सर्व अशुद्धतेपासून मुक्त करण्यासाठी ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’महत्वाचे आहे. पर्यावरण आणि सामाजिक जडणघडणीला धोका निर्माण करणारी अनेक आव्हाने आणि वाईट गोष्टींचा सामना करण्यासाठी, तसेच समतोल, सदभाव आणि पवित्रता पुनर्संचयित करण्यासाठी हे यज्ञ एक शक्तिशाली साधन आहे. ‘अश्वमेध यज्ञ’ हा केवळ धार्मिक विधी नसून, याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा प्रभाव आहे. असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.

अखिल जागतिक गायत्री परिवाराच्यावतीने आज खारघर पश्चिम नवीमुंबई येथील कॉर्पोरेट पार्क या ठिकाणी आयोजित पाच दिवसीय ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’ कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.

यावेळी वन, सांस्कृतिक आणि मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार, अखिल विश्व गायत्री परिवार अध्यक्ष श्रद्धेय शेलबाला पण्डया, गायत्री विदयापीठाचे अध्यक्ष, शेफाली पण्डया, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कुलगुरु डॉ. चिन्मय पण्डया, आदी मान्यवर तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, या विशाल महायज्ञात सहभागी झालेले सर्व लोक भाग्यवान आहेत. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावण झालेली भूमी महाराष्ट्रात आहे. ही भूमी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाची आहे. ही भूमी त्र्यंबकेश्वराची आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या शिकवणुकीचे वरदान लाभले असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज अशा थोर संतांची आणि वीरांचीही ही भूमी आहे.

अशा पवित्र भूमीवर ‘अश्वमेध यज्ञ’आयोजित केला जात आहे ही मोठया भाग्याची गोष्ट आहे. असे मत राज्यपाल बैस यांनी व्यक्त केले.

अश्वमेध यज्ञा विषयी रामायणातील पुरावे देत राज्यपाल बैस म्हणाले की, रामायणाच्या युगात देखील ‘अश्वमेध यज्ञ’ करण्यात आला होता. ‘अश्वमेध यज्ञ’ हा केवळ धार्मिक विधी नसून, याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा गडद प्रभाव आहे. रामायणात आपल्याला आढळते की,अश्वमेध यज्ञाचा उद्देश राज्याचे वर्चस्व आणि एकता प्रस्थापित करणे हा होता. हे यज्ञ करून त्यांनी आपल्या प्रजेची समृद्धी, सुरक्षा आणि कल्याणासाठी सुनिश्चित केले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर सातत्याने पुढे जात आहे. अश्वमेध महायज्ञाच्या माध्यमातून आपल्याला आपले अंतःकरण आणि मन हे मत्सर, द्वेष आणि अज्ञानापासून मुक्त करायचे आहे. तसेच राज्याच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्राचीन अश्वमेध यज्ञातील मूल्ये अंगीकारण्याचे आवाहनही राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.

अखिल जागतिक गायत्री परिवाराने सप्तसूत्र चळवळ अंतर्गत व्यसनमुक्ती अभियानाचे आयोजन केले असून, ही चळवळ गायत्री परिवाराच्या सृजन सदस्यांनी देशभर चालवली आहे. आज समाजात व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, लहान मुले मोठया संख्येने त्याचे बळी ठरत आहेत. अभियानाच्या माध्यमातून करोडो लोकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. हे काम प्रशंसनीय असून ते प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात घेऊन जायचे असून, सर्व राज्याच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना आपला परिसर अमली पदार्थांपासून मुक्त ठेवण्याबाबत जागरूक राहण्याच्या सूचना यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या.

यावेळी बोलतांना राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विठ्ठलाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत हा अश्वमेध महायज्ञ होतो आहे. याचा मला अभिमान आहे. मुंबईतील पाच दिवसीय अश्वमेध महायज्ञचा शुभारंभ झाला आहे. या अश्वमेध महायज्ञामुळे फक्त वायु मंडलातील प्रदूषण मुक्त होणार नाही तर आपल्या अंतरमनातील प्रदूषणाचेही शुद्धीकरण होईल. हे वर्ष सर्व भारतीयांसाठी ऐतिहासीक आणि अविस्मरणीय आहे. करण या वर्षाच्या प्रारंभी आयोध्येत प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा झाली आहे. राम मंदिराचा प्रत्येक दरवाजा महाराष्ट्रातील सागवनापासून तयार केला आहे. ही महाराष्ट्रसाठी अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्राला महा बनविण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात होणे आवश्यक आहे. त्यामुळेच गायत्री परिवाराने महायज्ञासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रास्तवित भाषणात देव संस्कृती विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कुलगुरु डॉ. चिन्मय पण्डया यांनी अश्वमेध महायज्ञाचा इतिहास सांगितला. तसेच या पाच दिवसीय महायज्ञाची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Wed Feb 21 , 2024
पुणे :- भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी १३ फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रेड्समॅन, अग्निवीर महिला सैनिकी पोलिस यांचा तसेच नर्सिंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com