नागपूर :- घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यांची नागपूर जिल्हातील संख्या तब्बल 16 हजार 192 झाली आहे. व त्यांच्याकडून एकूण 172 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे.
सौर ऊर्जा निर्मितीसाठी रूफटॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे प्रकल्प क्षमतेनुसार 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीज वापरामुळे ग्राहकाच्या वीजबिलात मोठी कपात होते. याशिवाय या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंग द्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते.
ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. सोबतच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महावितरणकडे नोंदणीकृत एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते, सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो. यामुळे ही योजना लोकप्रिय होत असून अधिकाधिक वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.