नागपूर :- महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून शासनाच्या हेतू पूर्तीची पावतीही आपसूक मिळतांना दिसत आहे.
हिंगणा तालुक्यातील वागदरा येथील लक्ष्मी मंगेश नागपुरे सांगतात या योजनेचे 3 हजार रुपये बँक खात्यात 15 ऑगस्ट रोजी जमा झाले. राज्याचे मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या बहीणीला ही मदत ऐन रक्षाबंधनाच्या पर्वावर मिळत असल्याचा अत्यानंद झाला. लक्ष्मी गर्भवती आहेत. या पैशांचा विनियोग त्या गरोदरपणात सकस आहार, फलाआहाराकरिता आणि महत्वाच्या चाचण्यांसाठी करणार असल्याचे सांगणाऱ्या लक्ष्मी आता बाळाच्या आगमनासाठी उत्सुक असतांना या योजनेच्या लाभाने अधिक उत्साही व आनंदी दिसून आल्या. या योजनेच्या लाभापोटी मिळणाऱ्या पैशांमधून स्व खर्च भागविता येणार असल्याचा विश्वास त्या व्यक्त करतात.