– महाराष्ट्र शासनाचे कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे उत्तम कार्य
– ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर :- भारत देशाला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. या कलेचा विकास करण्यासाठी कलाकारांनी लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून उत्तम कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. तसेच, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्तम कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी विभागाच्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन २०२४-२५ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कला संचालनालयाचे संचालक डॉ. संतोष क्षीरसागर, उपसंचालक विनोद दांडगे, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपुरचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
कला ही जात, धर्म, पंथ असा भेद न मानता समाजातील सशक्त सांस्कृतिक वारसा पुढे नेत असते. कला सतत विकसित होत असते. कलाकारांनी लोकाभिमुख दृष्टिकोनातून उत्तमोत्तम कार्य करून कलेचा हा वारसा पुढे घेऊन जावा, असे गडकरी म्हणाले.
कलाकारांना संधी व प्रोत्साहन मिळणे आवश्यकता असते. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या वतीने १९५६ पासून राज्य कला प्रदर्शन आयोजनाद्वारे कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामाध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळते. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी नागपूर मधील वैभवशाली कला संस्कृतीच्या परंपरेवरही प्रकाश टाकला.
शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपुरचे माजी प्राध्यापक नंदकिशोर मानकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ७ कला प्रकारात ३१ कलाकृतींना पारितोषिक व ३४ कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनाही प्रोत्साहनार्थ विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले.
कला संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय महाविद्यालय, निमशासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त कला संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी १९५६ पासून राज्याच्या विविध भागात राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यावर्षी नागपुरात आयोजित या प्रदर्शनासाठी ४ शासकीय, ३१ अनुदानित १७८ विनाअनुदानित कला संस्थांमधील एकूण ३ हजार २३४ विद्यार्थ्यांकडून ४ हजार ७४४ कलाकृती पाठविण्यात आल्या.त्यापैकी ९९३ कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड झाली.
प्रारंभी डॉ. संतोष क्षीरसागर यांनी अहवाल वाचन केले. ६४व्या राज्य कला प्रदर्शन स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.