अरोली :- संपूर्ण मौदा तालुक्यात नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमधून उत्कृष्ट चमूंची निवड करून त्यांना तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आज 19 डिसेंबर गुरुवारला मौदा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यंदा या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी वाकेश्वर येथील वर्ग एक ते आठ मधील एकूण 101 पटसंख्या असलेल्या शाळेतील फक्त 24 विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय स्पर्धेत नेण्यासाठी शाळेतील सर्व पाच शिक्षक उर्वरित 77 विद्यार्थ्यांची शाळा बुडवून ,शाळा बंद करून स्पर्धेत सहभागी झाल्याने येथील शिक्षक व व त्या सर्व शिक्षकांना बोलावणाऱ्या शिक्षण विभागाचे असं वागणे बरं नव्हे, असा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते व पालकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर केला आहे व हा प्रकार आज 19 डिसेंबर गुरुवार ला दुपारी साडेबारा ते एक वाजता दरम्यान वृत्तपत्र वाटप करत असताना दिसून आला.
सर्व शासकीय शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्षभरात अनेक सुट्टया असतात, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय जास्त ,अभ्यासक्रम जास्त व तासिका कमी पडतात, त्यातच 24 विद्यार्थ्यांना मौदा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नेण्यासाठी सर्व शिक्षकांची गरज नसतांना, शाळेत दोन ते तीन शिक्षक उपस्थित राहूनही शाळा सुरू ठेवता आली असती व विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या कामही करता आला असते, असे येथील पालक वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले. याबाबत येथीलच शिक्षक टेकाम यांना भ्रमणध्वनी वरून विचारपूस केली असता, यंदा आमच्या शाळेतील चमूंची संख्या जास्त असल्याने, त्यातच आमच्या शाळेतील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत लंगडी, खो-खो, कबड्डी, रिले या सामूहिक स्पर्धेत तर कुस्ती व 100 ,200 मीटर या वैयक्तिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने, या सर्वांची निवड तालुकास्तरीय स्पर्धेत करण्यात आली होती. त्यातच आमच्या शाळेतील काही शिक्षकांची नेमणूक तेथे पंच म्हणून करण्यात आली होती, त्यामुळे यंदा शाळा बंद करून तालुकास्तरीय स्पर्धेत सर्वच शिक्षक सहभागी झाले होते. मात्र मागच्या वर्षी शाळा बंद न करता तालुकास्तरीय स्पर्धेत येथील खेळाडूंनी भाग घेतला होता हेही त्यांनी आवर्जून सांगितले. येथील मुख्याध्यापक देवचंद थोटे हे मागील चार दिवसापासून सुट्टीवर आहेत. त्यांच्या चार्ज दुसऱ्या एका शिक्षकाकडे असून आपण त्यांच्यासोबत या विषयावर सविस्तर बोलावे असे त्यांनी सांगितले, मात्र बोलण्यासाठी त्या दोघांच्याही संपर्क क्रमांक पाठविण्यासाठी दोनदा शिक्षक टेकाम यांना संपर्क केला असता त्यांनी त्यांचे संपर्क क्रमांक पाठवत आहे , पाठवत आहे असे म्हणत टाळाटाळ केली व बातमी लिये पर्यंत शेवटी पाठविले नाही, हे विशेष.