संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– (पाच वर्षीय बालिका मृत्यू प्रकरण)
कामठी :- कामठी निवासी राजेश भीमराव डहाट हे आपली पत्नी भाग्यश्री, मुलगा द्रोवील (10) व मुलगी आलिशा (5) यांना मोटर सायकलने कामठी कन्हान महामार्गाने देवलापार कडे होळीच्या दिवशी 25 मार्च 24 रोजी सायंकाळी जात असताना काळ्या रंगाच्या कारणे त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची पाच वर्षाची आलिशा नावाची मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला चौधरी हॉस्पिटल, आशा हॉस्पिटल व नंतर तिथून मेयो हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
ही अपघाताची घटना घडली ते कमसरी बाजार रोड कंट्रोलमेंट चेकपोस्ट जवळ असल्याने त्या परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. अपघातग्रस्त लोकांनी त्या कारचे अंदाजे नंबर सांगून वर्णन सुद्धा केलेले आहे. कामठी पोलिसांनी एफ आय क्रमांक 179/2024 नोंदविला. परंतु स्थानिक कामठी पोलिसांनी त्याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचा शिष्टमंडळाने आरोप केला. त्या घटनेला दोन महिने होऊनही अजून पर्यंत त्या कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही. घटनेच्या दिवशी स्थानिक नागरिकांनी कामठी पोलीस स्टेशनला घेराव घातल्याने त्या कारचालकाला विना विलंब अटक करण्याचे आश्वासन दिले होते.
त्या खुनी कार चालकाला विना विलंब हिट अँड रन कायद्या अंतर्गत अटक करून कार्यवाही करावी अन्यथा बसपा तर्फे मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी विधानसभा अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम यांनी केला असता आज दिनांक 27/ 5 / 2024 रोजी आलिशा च्या परिवाराला घेऊन बसपाच्या शिष्टमंडळाने तहसिलदार कामठी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी नागपूर व मृख्य पोलीस अधिकारी जुने पोलीस स्टेशन कामठी यांना निवेदन दिले.
शिष्टमंडळात कामठी माजी विधानसभा अध्यक्ष इंजि.विक्रांत मेश्राम, मृतक अलिशा चे वडील राजेश डहाट, आई भाग्यश्री, भाऊ द्रोविल तसेच नागसेन गजभिये ,सुधाताई रंगारी,माजी नगरसेवक विकास रंगारी,विशाल गजभिये, दिपाली गजभिये, निशिकांत टेंभेकर , प्रशांत गजभिये , बृद्धांश गजभिये आदीं पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उपस्थित होते.