यवतमाळ :- अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2024-25 वर्षात परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जागी निवडीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी व अल्पसंख्याक समुदाय घटकातील असावा. अर्जासोबत अल्पसंख्याक असल्याबाबत धर्माचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पत्र 8 लाखापेक्षा जास्त नसावे. परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उतीर्ण केलेला असावा. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत 200 च्या आत असावी.
सदर योजनेंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांस पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. अर्जाचा नमुना व अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या योजनेतील लाभाचे स्वरुप या लिंकवर उपलब्ध आहे. परिपुर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह समक्ष किंवा पोष्टाने दि.25 फेब्रुवारी पर्यंत समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे येथे सादर करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस परदेशातील शैक्षणिक संस्थेने नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गाचे परतीच्या प्रवासासह विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता दिला जाईल. विद्यार्थ्यांचा खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यूएसए व इतर देशांसाठी युके वगळून 1 हजार 500 युएस डॅालर आणि युकेसाठी 1 हजार 100 जीबीपी इतका निर्वाह भत्ता, इतर खर्च, आकस्मिक खर्च म्हणून देण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाने कळविले आहे.