नागपूर :- पावसाळ्याचे दिवस असून लहान मुलांना आजारापासून बचाव करण्याकरीता लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी मिशन इंद्रधनुष्य मोहिमेत शहरासोबतच ग्रामीण भागात पाच वर्षाच्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. बालकांचे लसीकरण करून डिजिटल एमसीपी कार्ड तयार करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली मिशन इंद्रधनुष्य व हत्तीरोग दुरीकरण मोहिमेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, डॉ. रेवती साबळे, डॉ. दिपीका साकोरे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. दोन वर्षापेक्षा लहान मुले, गर्भवती स्त्रीया, गंभीर आजराचे रुग्ण यांना या औषधोपचारातून वगळण्यात आले आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले. यासाठी घरोघरी भेटी देऊन कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीस हत्तीरोग व त्याची लक्षणे व प्रतिबंधाविषयी देण्यात येणार आहे. एमडीए उपचार पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.