नागपूर,दि.18 : शेतकरी व पशुपालकांच्या सशक्तीकरणासाठी विविध स्तरावर शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. किसान क्रेडीट कार्ड ही त्यापैकी एक योजना. सन २०२१-२२ या वर्षात राज्यातील सर्व पशुपालकांना किसान क्रेडीट योजनेचा लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय आणि वित्तियसेवा विभाग यांचे विद्यमाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीट कार्ड (KCC) ही राष्ट्रव्यापी मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.
या योजनेत कोणत्याही तारणा शिवाय पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीट कार्ड कर्ज मर्यादा रुपये १. लक्ष आहे. परंतु, जो पशुपालक शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूधसंघ, दूध उत्पादक कंपनीशी संलग्न आहे आणि कर्ज परत करण्याचा त्रिपक्षीय करार (सोसायटी, दूधसंघ, बँक व पशुपालक) करून कर्ज परत करण्याची हमी घेत असेल त्यांना कोणत्याही तारणा शिवाय ३.०० लक्षच्या मर्यादेत योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरीता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे.
पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, नागपूर या विभाग मार्फत संपूर्ण नागपूर जिल्ह्या मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजना, आदिवासी उपयोजना इत्यादी योजना राबविल्या जातात. या योजनांतर्गत अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर पशुधन वाटप (२ संकरित गायी, १० शेळ्या व १ बोकड करणे, दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेकरिता सुधारणा कार्यक्रम अंतर्गत १०० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना वैरण बियाणे वाटप करणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांकडील दुधाळ जनावरांना १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य वाटप करणे, अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक ३ दिवसीय प्रशिक्षण देणे अश्या प्रकारचे उपक्रम राबविल्या जातात.
सर्व पात्र पशुपालकांनी १५ फेब्रुवारीच्या आत पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीट योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद नागपूरच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेले आहे. पशुपालकांकरिता असलेल्या सर्व योजनांची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचेकडे उपलब्ध आहे.