– किरणापुर येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याची माजी ग्रा.पं. सदस्याची होती तक्रार
– बिडीओ जयसिंग जाधव ‘ ॲक्शन मोड ‘ मध्ये
रामटेक – तालुक्यातील काचुरवाही जवळील गट ग्रामपंचायत किरणापुर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार किरणापुर येथीलच रहिवाशी तथा माजी ग्रा.पं. सदस्य गजानन वांदे यांनी पंचायत समीती बिडीओ च्या नावाने गेल्या २०२२ च्या १२ डिसेंबरला दिली होती. तेव्हा बिडीओ जाधव यांनी पंचायत विस्तार अधिकारी सानप यांना तात्काळ आदेश देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावेळी पंचायत विस्तार अधिकारी सानप हे दुसऱ्या महत्वाच्या कामी असल्याने ते चौकशीसाठी गेले नाही व त्यामुळे या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात होती.
दरम्यान आपण तक्रार करूनही अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी किंवा कारवाई झाली नाही असे दिसुन आल्याने तक्रारदार गजानन वांदे यांनी देशोन्नतीच्या प्रतिनिधीपुढे सदर प्रकरण ठेवले. तेव्हा प्रतिनिधीने सदर प्रकरण आज दि. १० जानेवारीला रामटेक पंचायत समीतीचे गट विकास अधिकारी ( बिडीओ ) जयसिंग जाधव यांचेपुढे ठेवत त्यावर स्पष्टीकरण विचारले असता बिडीओ जाधव यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन तात्काळ ॲक्शन घेत पंचायत समीती येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्याला बोलवुन घेत ‘ उद्या मी व येथील पथक किरणापुर ग्रामपंचायला सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी येणार असल्याचे व संबंधीतांना तेथे हजर राहाण्यासंबंधीचे पत्र आजच काढा व त्यांना पाठवा ‘ असे फर्मान सोडले. यावेळी संबंधीत कर्मचारी त्वरीतच कामाला लागल्याचे चित्र दिसुन आले. त्यानुसार उद्या ११ जानेवारी ला बिडीओंसह पंचायत समीती मधील अधिकारी – कर्मचाऱ्यांचे पथक ग्रामपंचायत किरणापुर येथे चौकशी व दोष आढल्यास कारवाईसाठी दाखल होणार आहे.
असे आहे प्रकरण
किरणापुर येथील रहीवाशी तथा माजी ग्रा.पं. सदस्य गजानन वांदे यांनी गेल्या २०२२ च्या १२ डिसेंबरला पंचायत समीती रामटेक येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने रितसर लेखी तक्रार अर्ज दिला होता. त्यात गट ग्राम पंचायत किरणापुर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामात भ्रष्टाचार होत असुन जे व्यक्ती या योजनेंतर्गत कामाला सुद्धा जात नाही त्यांचेही मस्टर मारल्या जात असुन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला होता. विशेष म्हणजे अशा व्यक्तींची नावे सुद्धा तक्रारकर्ता गजानन वांदे यांनी आपल्या तक्रार अर्जात नमुद केलेली आहे. दरम्यान या प्रकाराबाबद संबंधीत रोजगार सेवकाला निलंबित करण्याची मागणी त्यांनी आपल्या तक्रार अर्जात केलेली होती.