– काटोल तालुक्यातील मेटपांजरा शिवारातील घटना
काटोल :- साक्षगंधाला कुटुंबीय कळमेश्वर येथे नातेवाईकाकडे जात असताना कार मेटपांजरा (ता. काटोल) रस्त्यावरच अनियंत्रित झाली आणि पुलाच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळली. यात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला असून, कारमधील पाचजण जखमी झाले. ही घटना काटोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर मार्गावरील मेटपांजरा शिवारात रविवारी (दि. १) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.
हेमराज भाकरे, सुनंदा हेमराज भाकरे, प्रीती गोपाल भाकरे, भारती प्रकाश भाकरे व कारचालक लुकेश बाळकृष्ण भाकरे (सर्व रा. बाभूळखेडा, ता. वरुड, जिल्हा अमरावती) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण कार (एमएच-२७/डीए-२०३४) ने बाभूळखेडा येथून जलालखेडा, काटोल मार्गे कळमेश्वरला त्यांच्या नातेवाइकाकडे साक्षगंधाच्या कार्यक्रमाला जात होते.
मेटपांजरा (ता. काटोल) शिवारात कार अनियंत्रित झाल्याने चालकाचा कार वरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेली कार क्षणात पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळली. यात कारमधील पाचजण जखमी झाले, तर एअर बॅग उघडल्याने इतरांना फारशी दुखापत झाली नाही. अपघात होताच स्थानिकांनी सर्वांना कारमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी काटोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. पाचही जणांना प्रथमोपचारानंतर नागपूर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.