इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी गणरायाच्या आरतीचा मान

– ‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुंबई :- मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान मंगळवारी (दि. 26) इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव काल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.त्यांच्याहस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या हाताने बाल गोपाळांना मोदक भरवले आणि त्यांचा सहकुटुंब शाही पाहुणचार केला. चिमुरड्यांनी केलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात वर्षावरील वातावरण भारावून गेले.

मंगळवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी यांनी गणेश दर्शन घेतले. सायंकाळच्या आरतीसाठी खास पाहुणे निमंत्रित होते ते म्हणजे इर्शाळवाडीतील बांधव. त्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी समन्वयन केले. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेदरम्यान मदत कार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भावनिक बंध जोपासणाऱ्या या क्षणांचे साक्षीदार ठरले विविध देशांचे वाणिज्यदूत.

‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’ या ओळीचा प्रत्यय देणारे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कृतीतून सामान्यांचे मुख्यमंत्री असल्याची प्रचिती देतात. गेल्या काही दिवसामध्ये ‘वर्षा’वरील श्री गणरायाचे दर्शन आणि आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. काल दुपारी त्र्यंबकेश्वरमधील आधार आश्रमातील मुलांनी वर्षा निवासस्थानी टाळ-मृदुंगाच्या गजरात आरती केली. त्यानंतर सायंकाळी इर्शाळवाडीतील बांधव सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली आणि नातू रुद्रांश हे या बाळ-गोपाळांसमवेत रमले. गळ्यात टाळ घालून मुख्यमंत्री ह्या मुलांसोबत आरतीसाठी उभे होते. मुख्यमंत्री प्रत्येक मुलाला बोलावून त्याच्या हातात आरतीचे तबक देत होते. यावेळी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांसह प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांच्याबरोबरच काही देशांचे वाणिज्यदूत देखील उपस्थित होते. त्यांच्या हाताने देखील आरती करण्यात आली. एका वेगळ्या अनुभवाचे साक्षीदार झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, रायगड पोलिस अधीक्षक अशोक घार्गे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख आदिंचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

२० जुलैला इर्शाळगडाची दुर्घटना घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत घटनास्थळावर थांबून मदतकार्यावर लक्ष ठेऊन होते. त्यानंतर महिनाभराच्या आतच म्हणजे १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पुन्हा एकदा इर्शाळवाडीवासियांच्या भेटीला गेले. त्यांच्या तात्पुरत्या निवासाच्या पाहणीसाठी त्यांनी दौरा केला आणि आता थेट आपल्या निवासस्थानी इर्शाळगडवासीयांना बोलावून गणराच्या आरतीचा मान दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील रखडलेल्या विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा - उपमुख्यमंत्री अजित पवार

Thu Sep 28 , 2023
मुंबई :- राज्यातील नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचे सक्षमीकरण करून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही पाचही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र, गेल्या 14 वर्षांत या ठिकाणी विमानसेवा सुरु होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com