नागपूर :- प्रादेशिक परिवहन ग्रामीण कार्यालयामध्ये नियमानुसार वाहन धारक, वाहन चालक व अर्जदारांना परिवहन विभागातील सेवा विहीत कालावधीत देण्यात येत आहेत. यासंदर्भात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत तसेच या कार्यालयाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार प्रलंबित नसल्याचा खुलासा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केला आहे.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संघटना आणि नागपूर ट्रकर्स युनिटी या संघटनेनी वाहतूक करणाऱ्या वाहन धारक व चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी गैरहजर असल्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याबाबत आरोप केले होते. त्यासंदर्भात परिवहन कार्यालयातर्फे वस्तुस्थिती दर्शक खुलासा करण्यात आला आहे. या कार्यालयामध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची काही पद रिक्त असून या कार्यालयास प्राप्त अर्जांवर कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढण्याची जबाबदारी कार्यरत अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन कामे विहीत मुदतीतच होत असल्याचे काठोळे यांनी सांगितले आहे.
प्रादेशिक परिवहन ग्रामीण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणचे कार्यालय व मुख्य कार्यालयाकडे विभागाने निश्चित करुन दिलेले कामकाज मोटार वाहन अधिनियम 1988 व त्याखालील नियमानुसार कामकाज पार पाडण्यात आले. 24 जुलै 2024 पर्यंत या कार्यालयाद्वारे वाहन धारक, अनुज्ञप्ती धारक आणि अर्जदारांना या विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवेअंतर्गत प्राप्त अर्जांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची विषयनिहाय माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वाहन नोंदणीचे (वाहन वितरकांकडे) 3 हजार 61 अर्ज, वाहन हस्तांतरण नोंदीचे 1 हजार 179 अर्ज, योग्यता प्रमाणपत्र (परिवहन वाहने) 894 आदी 29 सेवांचा समावेश आहे. यासोबतच या कार्यालयाकडून वाहन चालक व अर्जदारांना 24 जुलै 2024 पर्यंत देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अनुज्ञप्तींची माहितीही देण्यात आली आहे. यामध्ये तात्पुरती अनुज्ञप्ती जारी करण्यासंदर्भातील 3 हजार 488 अर्ज, नवीन अनुज्ञप्ती जारी करण्यासंदर्भातील 1 हजार 192 अर्ज, अनुज्ञप्ती नुतनीकरणाचे 877 अर्ज असे एकूण 22 प्रकारातील अनुज्ञप्तीची प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे खुलाशात म्हटले आहे. तसेच प्रादेशिक परिवहन ग्रामीण कार्यालयाबाबत नागपूर ट्रकर्स युनिटी यांनी केलेल्या आरोपाचे खंडण करत विभागाला निश्चित करुन देण्यात आलेल्या कालावधीत सर्वसामान्य जनतेला सेवा पुरविण्याचे काम पार पाडण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले आहे.