राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– विमानतळांच्या संपूर्ण कामाचा समग्र आढावा

मुंबई :- राज्यात एकूण 32 विमानतळे आहेत. यापैकी बऱ्याचशा विमानतळांची विकास कामे सुरू आहेत. अशा विमानतळांवरील विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, पुरंदर, गोंदिया, गडचिरोलीसह अन्य विमानतळ विकासकामांचा समग्र आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस अपर मुख्य सचिव (विमान चालन) दीपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर येथील बोरामनी विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय विमानतळ प्राधिकरण व राज्य शासन यांच्यामध्ये विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करावा. होटगी विमानतळ विकासाकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आवश्यक भूमी अधिग्रहण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे. त्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा किंवा सरळ खरेदी पर्यायाची व्यवहार्यता तपासून एका पर्यायाचा उपयोग करीत भूसंपादन पूर्ण करावे. पुरंदर विमानतळ करिता आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन एकदाच करावे. पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडू नये. त्यासाठी अधिग्रहणाचा योग्य आराखडा तयार करावा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाकरिता आधी जमीन अधिग्रहण करण्यात यावे. त्यासाठी 600 कोटी रुपये लागणार आहेत. अमरावती विमानतळावर ‘ नाइट लँडिंग ‘ सुविधांची कामे सुरू आहेत, ही कामे मार्चपर्यंत पूर्ण करून सुविधा सुरू करावी. अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेऊन या कामाला गती द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात मोरवी विमानतळाच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे. या ठिकाणी धावपट्टी वाढविण्याला वाव असून त्यानुसार धावपट्टी वाढविण्यात यावी. धुळे येथील विमानतळ धावपट्टीचे पुनर्पृष्ठीकरण पूर्ण करावे. कराड विमानतळासाठी भूसंपादन पूर्ण करावे. विमानतळ विकासासाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक बोलवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जळगाव, गोंदिया, बारामती, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, लातूर, चीपी, शिर्डी येथील विमानतळ कामांचाही आढावा घेण्यात आला. बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावावीत - क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

Thu Jan 25 , 2024
मुंबई :- आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा व बंदरे विभागाची विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मंत्री बनसोडे यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला बंदरे विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!