ज्या काळात समाज शास्त्रांचा मथितार्थ योग्य रीतीने समजून न घेता चुकीचे पायंडे लावून विघटन करत होता त्याचवेळी धर्मपंडितांना आणि समाजातील राजकीय वरिष्ठांना न दुखवता शास्त्रांमधील विचारांची योग्य मांडणी करून विचारधारेत आमुलाग्र बदल अहिल्याबाई होळकर यांनी केला. स्त्री ला अबला न म्हणता तिला तिच्या स्वकर्तृत्वावर जगता यावं यासाठी आणि परिसरात जीवनसुधाराच्या आवश्यक गोष्टींची रुजूवात करुन समाजाला सशक्त करण्याचा ध्यास घेऊन अहिल्याबाई होळकर यांनी कार्य केले म्हणून त्या कर्मयोगगिनी ठरल्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाची, निष्ठेने आणि अत्यंत कुशलतेने केलेल्या राज्यकारभाराची तसेच धर्माधिष्ठित न्यायव्यवस्थेने कार्य करण्याची गाथा सर्वांना पुन्हा एकदा कळावी या उद्देशाने मानिनी बहुउद्देशीय संस्था निर्मित आणि नटराज आर्ट्स ऍण्ड कल्चर सेन्टर नागपूर द्वारा प्रस्तूत “कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर” या एकपात्री प्रयोगाचे आयोजन नुकतेच धरमपेठ येथील नटराज आर्ट्स ऍंड कल्चर सेन्टर येथे करण्यात आले.
डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी याचे लेखन करुन अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील विविध पैलूंचे प्रकटीकरण केले ज्याचे सादरीकरण नागपुरातील जाणत्या अभिनेत्री डॉ. दीपलक्ष्मी दिलीप भट यांनी अत्यंत चपखलपणे करून उपस्थित समुदायाची प्रशंसा मिळविली.
या एकपात्री दीर्घांकाचे योग्य दिग्दर्शन आणि नेपथ्य स्वप्निल बोहटे यांनी केले, संगीत अनिल इंदाणे यांचे तर प्रकाशयोजना वैदेही चवरे याची होती
कार्यक्रमाला धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर विशेषत्वाने उपस्थित होते. यावेळी डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी “कर्मयोगिनी” या संज्ञेची उकल त्यानिमित्ताने केली.
अत्यंत प्रभावीपणे सादर झालेल्या या सादरीकरणाला नटराज आर्ट्स ऍण्ड कल्चर सेन्टर नागपूर चे प्राचार्य डॉ. रविन्द्र हरदास आणि धरमपेठ शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यासह रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.