नागपूर :- नागपूर विभागात सोयाबीन पिकावरील खोडमाशी आणि मका पिकावरील फॉलआर्मीवर्म लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करुन पेरणीचे नियोजन करण्याचे आवाहन, कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार यांनी केले आहे.
विभागात कापूस पिकानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. मागील चार -पाच वर्षांपासून सोयाबीनवर खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून किटकशास्त्र विभागाने बीज प्रक्रिया करुनच सोयाबीन पीक पेरावे, असा संदेश प्रसारित केला होता. परिणामी बीज प्रक्रियेच्या उपयोगामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करुन लागवड करावी. रासायनिक किटकनाशक हायोमेथोक्झाम 30 टक्के, एफएस १० मी.ली./१ किलो बीयाणे बीज प्रक्रिया करुनच पेरणी करावे, असे कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. काही ठीकाणी हायोमेथोक्झाम बीज प्रकिया केली नसल्यास सोयाबीन पीक १५ दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन ५० टक्के, ३ मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के, ६.७ मी.ली. किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल १८.५ टक्के ३.० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचेही सांगण्यात आले आहे.
मका पिकावर विभागात फॉलआर्मीवर्म लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. बीज प्रक्रिया करुन पेरणी केल्यास या अळीच्या प्रादुर्भावास अटकाव करता येईल, असा सल्ला देत कीड व्यवस्थापनाचे उपाय सुचविण्यात आले आहेत. याअंतर्गत खताची मात्रा देणे, नत्र खताचा अतिरिक्त वापर करु नये. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी २० याप्रमाणे पक्षी थांबे उभारणे, रासायनिक किटकनाशकांची फवारणी टाळणे व जैविक किटकनाशकाचा वापर करणे आदींचा समावेश आहे.