संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16:-कामठी तालुक्यातील आजनी या गावात काही वर्षांपूर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते हेमराज भाऊ दवंडे आणि महिला मंडळांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री विरूद्ध एल्गार पुकारून नियोजनपूर्वक अवैध दारूची दुकाने बंद करून दाखविली होती. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव घेऊन पोलिसांच्या सहकार्याने ही दारूबंदी यशस्वी करून दाखवली होती. परंतु, काळ लोटला आणि आजनी गावात पुन्हा एकदा गावातीलच अवैध दारू विक्रेत्यांनी अवैध दारूविक्रीचा अगदी सुळसुळाट केला. गावातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात या मद्यापानात गुंतल्याने गावात भांडण तंटे, व्यसनाधीनता वाढीस लागली आहे. कामठी ग्रामीण पोलिसांनी अनेकदा प्रयत्न करूनही यावल अंकुश बसविता आला नाही. गावातील या मद्यपींमुळे गावातील मोठ्या प्रमाणातील स्त्री वर्ग त्रासलेला आहे. याच व्यसनांनी गावातील अनेकांचे बळी सुद्धा घेतलेले आहे. अनेकांच्या कुटुंबाची वाताहत होत आहे. राज्य शासनाने अनेक ठिकाणची दारूबंदी उठवली असली तरी या दारूमुळे संसाराची काय अवस्था होते, याकडे लक्ष द्यायला हवे,असा सूर जनसामान्यांत उमटून राहिला असतांनाच आजनी गावात पुन्हा एकदा युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या अवैध दारूविक्री विरूद्ध एल्गार पुकारला आहे.
या आंदोलनाची पहिली पायरी म्हणून गावातील सुशिक्षित तरुणांनी सोमवार दिनांक १३ जून २०२२ रोजी गावातील सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात यावा यासाठी ग्रामसचिव डोरले यांना लेखी निवेदन देण्यात आले. तर १६ जून रोजी कामठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ उपपोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, आजनीचे पोलीस पाटील बळवंतरावजी रडके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिवाकरजी घोडे यांना याविषयी कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल गजभिये, निखिल भोयर, शेषराव घोडे, गजेंद्र ढोक, महेंद्र भोयर, महेंद्र मीरासे, निखिल नेऊलकर, विजय वानखेडे यांची उपस्थिती होती. यावरही अवैध दारू विक्री बंद करण्यात आली नाही तर गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
या सामाजिक चळवळीसाठी महिला मंडळींसह दीपक घोडे, अनुराग रडके, दीपक दवंडे, लिलाधर दवंडे, अमोल सोनटक्के, पवन कान्हारकर, विक्की घोडे, मंगेश रामटेके, हर्षद देशमुख, दर्पण घोडे, अश्विन खंडाते, राहुल दवंडे, अमित भोयर,मपित कोठाडे, संजय येलेकर, निखिल रहांगडाले, प्रथमेश नागोसे आदींचे सहकार्य आहे.