नागपूर :- येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीत धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह आरोग्य व सुरक्षाविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.दीक्षाभूमी परिसरात पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वैद्यकीय उपचार केंद्र, रुग्णवाहिका, माहिती कक्ष आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलीस तैनात असून परिसराच्या निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांनी मदत कक्ष स्थापन केला आहे. काही समस्या उद्भवल्यास पोलिसांच्या मदत कक्षाशी तसेच 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. अनुयायांना सहकार्य करण्यासाठी स्मारक समितीतर्फे समता सैनिक दलाचे दोन हजार स्वयंसेवक तैनात केले आहेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमीवर बौध्द धम्माची दीक्षा घेतली. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा सोहळा होऊ शकला नव्हता. यंदा मुख्य सोहळ्यासाठी देशभरातून अनुयायी मोठ्या उत्साहात दीक्षाभूमीत दाखल होत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे यावर्षीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार यंदाचा मुख्य कार्यक्रम विजयादशमीला (दि. 5) होणार आहे. स्मारक समितीतर्फे धम्म पहाट हा कार्यक्रम, तसेच सकाळी नऊ वाजता सामूहिक बुध्द वंदना व सायंकाळी सहा वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे.पाऊस आल्यास दीक्षाभूमीच्या जवळपास असलेल्या शाळांमध्ये अनुयायांसाठी आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरातील सर्व बुद्ध विहारांमध्ये अनुयायांची व्यवस्था बुद्ध विहार कमिटीने करावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. पाच तारखेला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण सायंकाळी पाच वाजेपासून डी डी सह्याद्री, आवाज इंडिया वाहिनीसह युसीएन या स्थानिक वाहिनीवरून केले जाईल.जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका, पोलीस प्रशासन व अन्य सर्व यंत्रणा देश- विदेशातून येणाऱ्या अनुयायांना सोयीसुविधा देण्यासाठी सज्ज आहेत. स्मारक समितीचे सदस्य सुधीर फुलझेले, एन.आर.सुटे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ चंद्रशेखर मेश्राम, भंते नागदिपांकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य बी. ए. मेहरे, मिलिंद गाणार आदी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या व्यवस्थापन करीत आहेत.
धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी प्रशासन सज्ज !
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com