दीक्षाभूमीवर “संकल्प”तर्फे भोजनदानाला सुरुवात , आमदार डॉ.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात गत ३५ वर्षांपासून उपक्रम सुरू  

सारनाथचे भन्ते बौद्धप्रिय, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते उद्घाटन  

लाखो अनुयायांना भोजनदानाचा लाभ मिळणार 

नागपूर :- माजी ऊर्जा मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात गत ३५ वर्षांपासून पवित्र दीक्षाभूमी येथे “संकल्प”सेवा भावी संस्थेच्या माध्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांना भोजनदान देण्यात येते. “संकल्प”च्या भोजनदानाला आज मंगळवारी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सारनाथचे भदंत बौद्धप्रिय, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते सुरुवात झाली. दीक्षाभूमीवर आलेल्या गोरगरीब अनुयायांना भोजनदान करून “संकल्प”च्या उपक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यंदाही लाखो अनुयायांना “संकल्प”च्या माध्यमातून भोजनदान करण्यात येईल असे कुणाल राऊत यांनी यावेळी सांगितले.

“संकल्प” ही नोंदणीकृत सामाजिक संस्था मागील ३५ वर्षापासून दलित, शोषित, मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी अनेक विभिन्न कार्यक्रम सतत राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, आर्थिक समतेचे व आमुलाग्र परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी ही संघटना सातत्याने झटत आहे. तसेच सन 1986 पासून “संकल्प” संस्थेव्दारे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास देशाच्या विविध प्रांतातुन तसेच महाराष्ट्राच्या वेग-वेगळया जिल्हातून तसेच गाव खेड्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना दरवर्षी सतत 3 दिवस उत्तम भोजन उपलब्ध करुन देण्यात येते.

सन 2020 मध्ये कोविड -19 चे लॉकडॉऊन दरम्यान “संकल्प” संस्थेतर्फे सतत 49 दिवस नागपूर शहरातील गरजू नागरिक तसेच रेल्वे प्रवासी मजुरांना सकाळ संध्याकाळ मोफत भोजन वितरण करून महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला बरीच मदत केली आहे. या उपक्रमास नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी भेट देवून उपक्रमाची प्रशंसा केली. नागपूर महानगरपालिका आयुक्त व नागपूर शहर पोलिस प्रशासनाने संस्थेतर्फे करण्यात आलेल्या ह्या लोकोपयोगी उपक्रमास प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले आहे.

मागील दोन वर्ष कोरोनाचे असल्याने लॉकडाऊन होते त्यामुळे दिक्षाभुमी येथील कार्यक्रम घेता आले नाही. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनाला 66 वर्ष पूर्ण होत असल्याने यावेळी दिक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिनाचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे. या निमित्ताने दिक्षाभूमीवर येणाऱ्या लक्षावधी धम्मयात्रेकरूंसाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान “संकल्प”च्या वतीने लाखो भाविकांसाठी अविरत भोजनाची व्यवस्था, शुध्द पेयजलाची व्यवस्था, विश्राम करण्यासाठी भव्य पेंडालची व्यवस्था, स्नानगृहाची व शौचालयाची व्यवस्था, शासनाच्या रोजगार संबंधी माहिती व इतर लोकापयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदा भव्य गर्दी बघता लाखो अनुयायांना भोजनदान करण्याचा मानस “संकल्प”च्या वतीने वर्तविण्यात आला आहे. हा उपक्रम माजी ऊर्जा मंत्री आमदार डॉ.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात पुढील तीन दिवस अविरत सुरु राहणार आहे.

उद्घाटनीय कार्यक्रमाला “संकल्प”चे अनिल नगरारे, अशोक हुमणे, राजा करवाडे, विनोद शेंडे, विनय सहारे, शशिकांत रायपुरे, युवक काँग्रेसचे निलेश खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com