वाशिम :- विदर्भाच्या विकासाचे काम अतिशय वेगाने महायुती सरकारने केले.आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याला महायुती सरकारने विकासाच्या केंद्रस्थानी आणले आणि विदर्भात आतापर्यंत झालेल्या विकासकामांचे श्रेय हे केवळ महायुती सरकारचेच आहे. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा महायुती सरकार आल्यावर शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम येथील जाहीर सभेत केली. येत्या काळात वाशिम जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदार संघातील सई डहाके, वाशिमचे श्याम खोडे आणि रिसोडच्या उमेदवार भावना गवळी या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या या सभेला व्यासपीठावर महंत जितेंद्र महाराज, डॉ.रणजीत पाटील, माजी आमदार विजयराव जाधव, महंत अभी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देऊन अनेक कामे केली. त्याचे श्रेय सर्वस्वी महायुतीचेच आहे. वाशिम जिल्हा हा सातत्याने दुर्लक्षित असलेला जिल्हा होता.जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थीतीमुळे कनेक्टिव्हीटी नव्हती आणि त्यामुळे हवा तसा जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही.पण 2014 साली भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर आपण वाशिम जिल्ह्याला विकासाच्या केंद्रस्थानी आणले आणि आज समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढून हा मध्यवर्ती जिल्हा झाला आणि भविष्यात समृद्धी महामार्गामुळे या भागात मोठी औद्योगिक प्रगती होताना दिसेल.अनेक राष्ट्रीय महामार्गांनी या जिल्ह्याला जोडण्याचे काम आपण केले. रस्ते पूलांसाठी 900 कोटी रुपये दिले. खामगाव जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली आणि कोट्यवधींचा निधी देऊन या भागात रेल्वेचे जाळे तयार करण्याचे काम आपण केले. काबरा आणि सावरगाव माळ या दोन ठिकाणी दोन औद्योगिक विकास केंद्र तयार करत आहोत त्या माध्यमातून तरुणाईच्या हाताला काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी गडाकडे साठ – सत्तर वर्षात कुठल्याही सरकारने लक्ष दिले नव्हते.
2014 मध्ये सरकार आल्यावर आपण 100 कोटी रुपये दिले. त्यानंतर महायुती सरकारने आणखी 600 कोटी रुपये विकासासाठी दिले. मला अभिमान आहे की बंजारा समाजाच्या इतिहासात इतक्या वर्षात पोहरागडावर भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी कुठलेही पंतप्रधान आले नव्हते. मा.नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत की जे पोहरागडावर आले आणि सेवालाल महाराजांचे दर्शन त्यांनी घेतले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.