– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कस्तुरचंद पार्कवर ध्वजवंदन
नागपूर :- भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 26 जानेवारीला सकाळी ठीक सव्वा नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे.
कस्तुरचंद पार्क येथे यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. मान्यवरांना निमंत्रण पाठविण्यात आले असून आज पोलीस दल व विविध पथकांनी या ठिकाणी पतसंचलनाची रंगीत तालीम केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वजवंदनानंतर नागरिकांना संबोधित करणार आहे. यावेळी प्रमुख अतिथींच्या विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती, पोलीस दलांचे लयबद्ध पथसंचालन, बघायला मिळणार आहे. पतसंचलनामध्ये 24 विविध पथक सहभागी होत आहे. यामध्ये पोलीस दलांसह विद्यार्थी, विद्यार्थिनी ,पोलीस शॉन पथक, भोसला सैनिकी शाळा, मनपा, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, क्रीडा विभाग व कृषी विभागाची अद्यावत तयारी दर्शविणारे चित्ररथ ही असणार आहे.
*समालोचन करण्याचा विक्रम*
नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचे संचलन करण्याचे कार्य यावर्षी देखील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळीवकर करणार आहेत. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून ते या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे समालोचन करत असून त्यांच्या समालोचनाचा हा 41 वा वर्धापन दिवस आहे.
त्यांच्यासोबत यावर्षी आकाशवाणी नागपूरचे समालोचक महेश बागदेव हे देखील या कार्यक्रमाचे धावते समालोचन करणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या कार्यक्रमाचे समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.