गडचिरोली पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री दिवाळीसाठी गडचिरोली जिल्हयात

नागपूर :- दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे. त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसून मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आज भामरागड येथे जात असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नक्षलवादासोबत सामना करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भामरागड परिसरातील धोडराज पोलीस चेक पोस्ट येथे पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते आज येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी विमानतळावर ते बोलत होते.

नागपूरवरून भामरागड या भागातील दौऱ्यासाठी ते हेलिकॅप्टरने रवाना झाले. दुपारी ३ नंतर गडचिरोली जिल्हातील कार्यक्रम आटपून ते मुंबईला प्रयाण करतील.

तत्पूर्वी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,दिवाळी सारख्या सणाला आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या, आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करणे समाधानाची बाब आहे. पालकमंत्री असताना दिवाळी पोलिसांसोबत साजरी करीत होतो. आता हळूहळू गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपत असल्याचा आनंद आहे.

नागपूर विमानतळावर स्वागत

तत्पूर्वी आज ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक दिवसीय गडचिरोली दौऱ्यासाठी नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर विमानतळावर स्वागत स्वीकारून त्यांनी गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली जिल्हयाचा दौरा केला होता.तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी घेतली होती.

आज नागपूर विमानतळावर खासदार कृपाल तुमाणे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी,अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com