मनपाने नेमलेले २५ ब्रिडींग चेकर्स करणार तपासणी
मोहीमेचा पहिला टप्पा पुर्ण – ५ टक्के दुषित घरे
दुसऱ्या टप्प्यात दूषित आढळल्यास होणार दंड.
चंद्रपूर – संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी सुरु असलेली डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम पुर्ण क्षमतेने राबविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
डेंग्यु प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्युचे २६५ रुग्ण मनपा हद्दीत आढळुन आले होते. मागील वर्षी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते त्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आयुक्त राजेश मोहीते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात या मोहिमेत मनपाने नेमलेले २५ ब्रिडींग चेकर्स, ३५ एएनएम, ७ एमपीडब्लु व १२८ आशा वर्कर प्रत्यक्ष सहभागी आहेत.तसेच स्वच्छता निरीक्षक यांचाही सहभाग आहे.
कंटेनर सर्वे मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घरांची तपासणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असुन यात ५ टक्के घरे दुषित आढळली आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा २५० घरांची रोज तपासणी केली जात आहे. दुसऱ्या तपासणीत जर पुन्हा तीच घरे दुषित आढळली तर त्यांना नोटीस देऊन दंडीत केले जाणार आहे.
शहरात मागील काही दिवसांपासुन संततधार पाऊस सुरु आहे. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.