नागपूर :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या मनुष्यबळाची डाटा एन्ट्री करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी शाखेत करण्यात येत आहे. यासाठी मनुष्यबळाची माहिती विविध शासकीय-निमशासकीय कार्यालय, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालय यांच्याकडून मागविण्यात आली होती. 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत एकूण 670 कार्यालये, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांकडून कर्मचारी व अधिकारी यांची माहिती अप्राप्त आहे. ही माहिती सोमवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील मनुष्यबळाची डाटा एन्ट्री सुरू असलेल्या कक्षात (एनआयसी) जमा करावी. जी कार्यालये, अनुदानित व विनाअनुदानीत शाळा, महाविद्यालये सदरची माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करतील किंवा माहिती लपविण्याचा प्रयत्न करतील त्या कार्यालय, शाळा, महाविद्यालय प्रमुख विरोधात लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये निवडणुकीच्या अतिसंवेदनशील, तातडीच्या व प्रथम प्राधान्याच्या कर्तव्यात कसूर केला आहे, असे गृहीत धरून त्यांचेविरुद्ध नियमानुसार 5 मार्चपासून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी कटाक्षाने नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.