– बसस्थानक परिसरातील हॉटेलसमोरील वाहनांवर रामटेक पोलिसांची कारवाई
– दुकांनासमोर रस्त्यावर वाहाने – रहदारीस अडथळा
– पार्कींग व्यवस्था ठरत आहे नागरीकांसाठी डोकेदुखी
रामटेक :- शहरवासीयांसाठी मोठी व नित्याचीच ठरत असलेली बिकट समस्या तथा डोकेदुखी म्हणजे येथील अवैध पार्कीग व्यवस्था होय. शहरातील बहुतांश व्यावसायीक दुकानांकडे पार्किंग व्यवस्थेची सोय नसल्यामुळे दुकानांपुढे रस्त्यावर अवैधरित्या उभे करण्यात आलेली वाहाने व त्यातुन होणारा रहदारीस अडथळा यामुळे नागरिक पुरते त्रासले असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे. ही बाब हेरून उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे तथा पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक २८ जुलैला पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे यांनी आपल्या ताफ्यासह बस स्थानक परिसरातील अवैध पार्किंग काढत विविध वाहनांवर कारवाई केली व रस्त्यावर अवैध पार्कींग केल्यास कारवाई करण्यात येईल अशी तंबी सुद्धा दिली.
शहरातील बसस्थानक चौक येथे चार मार्ग जोडलेले आहेत एक म्हणजे रामटेक मनसर दुसरे हिवरा बाजार मार्ग तिसरा गांधी चौक मार्ग चौथा रामटेक तुमसर भंडारा बायपास मार्ग. तेव्हा बस स्थानक परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते तथा येथेच बसस्थानक असल्याने प्रवाशांचीही दिवसभर रेलचेल सुरू असते. तेव्हा येथे रस्त्यावरती वाहने उभी केल्यास वाहतुक हमखास विस्कळीत होवु शकते यात दुमत नाही. सध्यास्थितीत बसस्थानक परिसरातील विशेषतः हॉटेल समोर अनेक नागरिक आपापली वाहने उभी करत असतात. येथे वाहनांचा पसारा जणु काही कचऱ्यासारखा पडलेला असतो. ही वाहने येथे तासन्तास उभे राहत असतात. काहींची वाहने तर अगदी रस्त्याच्या मधोमध येतात तेव्हा रस्ता हा अवैध पार्किंगसाठी की रहदारीसाठी ? असा प्रश्न निर्माण होत असतो तेव्हा याच अनुषंगाने आज दिनांक २८ जुलैला पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे यांनी येथील विविध वाहनांवर सक्तीची कारवाई करत नागरिकांना रस्त्यावरती अवैध पार्किंग न करण्याचा सल्ला दिला.
महत्वाचे म्हणजे व्यावसायीक प्रतिष्ठाणे अथवा काँम्प्लेक्स बांधकामाची अथवा लावण्याची परवानगी देत असतांना संबंधीत प्रतिष्ठाण तथा काँम्प्लेक्स मालक पार्कींग व्यवस्था करणार आहे किंवा नाही अथवा केली आहे की नाही हे नगरपालीका प्रशाषणाने पाहाणे गरजेचे असते व तेव्हाच परवानगी दिली जात असते मात्र स्थानिक नगरपालिका प्रशाषणाने पूर्वी तसे न केल्याचे दिसुन येते. तेव्हा नगर परिषद प्रशाषणाच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे आजस्थितीमध्ये बहुतांश व्यावसायीक काँम्प्लेक्स अथवा प्रतिष्ठानांना पार्किंग व्यवस्थाच नसल्याचे वास्तव आहे. तेव्हा अशा दुकानांमध्ये जाणारे ग्राहक रस्त्यावरच आपले वाहान ठेवुन जात असतात.