– कळमनातील जगदंबा प्लास्टिकवर मनपाचा छापा
नागपूर :- महाराष्ट्र राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना सुद्धा नागपुरात सर्रास कॅरी बॅगचे उत्पादन करणाऱ्या एका फॅक्टरीवर नागपूर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाने छापा टाकून फॅक्टरी सील केली आणि मोठ्या प्रमाणात 2187 किलो कॅरी बॅग्स जब्त केले. कळमना वस्ती येथील जगदंबा प्लास्टिकवर शुक्रवारी (ता. 21) छापा टाकण्यात आला.
मनपा घनकचरा व्यस्थापन विभागाचे संचालक आणि उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, त्यांना पर्यावरणप्रेमी शिवणकर यांनी कळमना येथे सिंगल यूज प्लास्टिक कॅरीबॅगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु असल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार मनपा आयुक्त तथा डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी (ता. 21) संबंधित फॅक्ट्रीवर छापा टाकण्यात आला. छापा टाकण्यात आला त्यावेळी येथे प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन सुरु होते. या फॅक्टरीच्या मालकाजवळ कोणतीही परवानगी नव्हती. फॅक्टरीमध्ये वापर करण्यात आलेल्या कॅरीबॅग पुनर्वापर करण्यासाठी विकत घ्यायचे आणि त्याचे दाणे तयार करून पुन्हा कॅरीबॅग तयार करायचे.
मागील काही वर्षांपासून त्यांचे हे काम सुरु होते. उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री वीरसेन तांबे आणि त्यांची चमू संपूर्ण कारवाई प्रसंगी उपस्थित होती. मनपा तर्फे महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण विभागाला सुद्धा याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फील्ड अधिकारी श्री. प्रमोद ढोणे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. मनपातर्फे पर्यावरण संरक्षण कायदा आणि प्लास्टिक बंदी कायद्या अंतर्गत 2187 kg सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच ही फॅक्टरी कुठल्याही परवानगीशिवाय प्रतिबंधित प्लास्टिक निर्माण करीत असल्यामुळे या फॅक्टरी ला सील लावण्यात आले आहे.
यासोबतच या अवैध सिंगल युज् प्लास्टिक निर्माण करणाऱ्या फॅक्टरी विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया करून कारवाई करण्यात येत आहे.