– मृत हा सुनील केदार यांचा कार्यकर्ता
नागपूर :- माजी राज्यमंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जीम संचालन करण्याच्या वादातून उद्भवलेल्या भांडणात एकाचा खून झाला. या प्रकरणातील दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी निर्दोष सुटका केली.
नरेंद्र जयशंकर सिंग आणि विकास महेश बगोटीया अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंगद रवींद्र सिंग (वय ३४वर्षे) रा. सावनेर असे मृताचे नाव आहे.
सावनेरमध्ये जीम संचालनामुळे अंगद सिंग व नरेंद्र सिंग यांच्या गटांमध्ये वर्चस्वासाठी वाद सुरू होता. या वादातून १२ जानेवारी २०२० ला रात्री ८.४५ वाजता गुप्ता गॅरेज, नाग मंदिराजवळ अंगद सिंग याला चर्चेला बोलवून धारदार शस्त्राने वार करून अंगदचा खून करण्यात आला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेंडे यांच्यासमक्ष खटला चालवण्यात आला. या प्रकरणी सरकारी पक्षाने १२ साक्षीदार तपासले. आरोपींच्यावतीने ॲड. आर. बी. गायकवाड आणि ॲड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले. सर्व साक्षीदाराचे जबाब व सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष सुटका केली.
जीम नव्हे तर युवक कॅांग्रेसच्या वादातून खून?
या घटनेनंतर अंगदसिंग यांच्या कुटुंबीयांनी ही घटना जीमच्या वर्चस्वातून घडलेली नसून युवक कॅांग्रेसमधील वादातून घडली, असे आरोप केले होते.