विद्यापीठात संत गाडगे बाबांच्या जयंतीप्रसंगी अभिवादन
अमरावती :- कर्मयोगी संत गाडगे बाबा यांनी दशसूत्रीच्या माध्यमातून विज्ञानवादी विचार दिलेत. मानवी कल्याणासाठी दशसूत्रीचा अवलंब फार महत्वाचा आहे. गाडगे बाबांच्या विचारानुसार देश समृद्ध होईल, त्यासाठी गाडगे बाबांचे विचार अंमलात आणण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. विद्यापीठातील श्री संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रात जयंती प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते.
पुढे बोलतांना कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, संत गाडगे बाबांचे नाव विद्यापीठाला दिल्यामुळे त्यांच्या विचारकार्याचा प्रसार करण्याची जबाबदारी आम्हां सर्वांवर आहे. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, व्यसन, वाईट चालीरिती, रूढी, परंपरा नाहीशी व्हावी, यासाठी समाजजागृती करुन स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून दिले. याशिवाय प्रत्येकजण शिकला पाहिजे, अशी आत्यंतिक तळमळ त्यांना होती. गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार कार्य करण्याची खरी गरज असून विद्याथ्र्यांपर्यंत हे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.
विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारा समोरील गाडगे बाबांच्या संदेशशिल्पाला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी पुष्पार्पण केले. यावेळी विद्यापीठ व्य.प. सदस्य डॉ. यादवकुमार मावळे, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे, आय.क्यु.ए.सी. संचालक डॉ. संदीप वाघुळे, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, आय.आय.एम.सी. संचालक डॉ. विरेंद्रकुमार भारती, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, उपअभियंता राजेश एडले, विद्यापीठातील तसेच आय.आय.एम.सी. मधील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठयासंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्री संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. दिलीप काळे यांनी केले.