नागपूर, ता. 24 : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून गुरुवारी 23 जून 2022 रोजी शहरातील 3917 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ही माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.जास्मीन मुलाणी यांनी दिली.
गुरुवारी (ता.23) झोननिहाय पथकाद्वारे 3917 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 94 घरे ही दुषित आढळली म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय 04 ताप असलेले रुग्ण आढळून आले. मनपाच्या चमूद्वारे २९ कुलर्स रिकामी करण्यात आले. 322 कुलर्समध्ये 1 टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर 948 कुलर्समध्ये 2 टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच 45 कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.
डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.