नागपूर :- दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आज विभागीय आयुक्त कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येत आहे. या औचित्याने सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली.सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी,आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात २२ ऑक्टोबर, २००१ च्या शासन आदेशान्वये दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. याअंतर्गत यावर्षी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. “सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृध्दी” ही या वर्षीच्या दक्षता सप्ताहाची संकल्पना आहे.