नागपूर :- नागपूरच्या मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स येथे येत्या 22 ते 23 नोव्हेंबर दरम्यानफार्माकोलॉजी विभाग, नॅशनल असोसिएशन ऑफ फार्माकोलॉजी अँड थेराप्यूटिक्स च्या मार्गदर्शनाखाली, फार्माकोलॉजी(औषधविज्ञाना) मध्ये पदव्युत्तरअभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी तिसऱ्या राष्ट्रीय परिषदे आयोजन ‘नेप्टीकॉन 2024 ‘चे आयोजन करण्यात आले आहे .या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची संकल्पना ‘सर्वोत्तम आरोग्यसेवेसाठी आधुनिक फार्माकोलॉजीतील नवनवीन सीमा शोधणे’ अशी असल्याची माहिती नेप्टीकॉन २०२४ चे आयोजक सचिव डॉ. गणेश डाखळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली . याप्रसंगी एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी, एम्सचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनिष श्रीगीरीवार उपस्थित होते .
या परिषदेत औषध निर्माण कंपन्यांमधील तज्ज्ञ तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमधील शैक्षणिक तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले असून नेप्टीकॉन – २०२४ मध्ये ५५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत .या परिषदेमध्ये औषध संशोधन ,रोग व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ,रुग्णांमध्ये क्लिनिकल ट्रायल्स अशा विविध विषयांवर फार्मा इंडस्ट्री त्याचप्रमाणे वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत . या परिषदेचे उद्घाटकीय सत्र एक 22 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11:45 दुपारी 1 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय परिषदेच्या सुरुवातीला 21 तारखेला परिषद पूर्व कार्यशाळा घेण्यात येतील यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन करतील वैद्यकीय शिक्षण विषयावर चर्चा, संशोधन तसेच नवीन औषध विकासाचे महत्त्व या कार्यशाळेमध्ये विषद करण्यात येईल . या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील एमडी फार्मकॉलॉजिस्ट मोठ्या संख्येने सहभागी होणार असून यामध्ये 13 तांत्रिक सत्रा मधून 250 पेक्षा जास्त संशोधन प्रबंध सादर केले जातील. त्याचप्रमाणे फार्माकोलॉजी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना संशोधक पुरस्कार आणि उत्कृष्ट संशोधनाला राष्ट्रीय पुरस्कार देखील दिले जाणार आहे. या परिषदेचा तपशील https://napticon2024.com/schedule-of-scientific-session/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,