-रेल्वे प्रवासादम्यान दारावर थांबून भ्रमणध्वनीवर बोलने महागात
-विधीसंघर्ष बालकांसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात
नागपूर – प्रवासाला निघताना किंवा परत येताना प्रवासी कुटुंबीय किंवा नातेवाईकांसोबत भ्रमणध्वनीव्दारे संवाद साधतात. विशेष म्हणजे रेल्वे दाराजवळ थांबून मोबाईलवर सुरक्षित असल्याचे किंवा प्रवासाला निघाल्याचे सांगतात. तेव्हा ते बोलण्यात व्यस्त असतात हीच संधी साधून मोबाईल चोरांची टोळी प्रवाशांच्या हातावर दांडा मारून मोबाईल खाली पाडतात तर कधी हिसकावून पळ काढतात. यामोबाईल चोर टोळीला लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले. विधीसंघर्ष बालकांसह चौघांना पकडून 2 लाख 43 हजार रूपये किंमतीचे एकूण 14 मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
तुमसर निवासी सचिन धुर्वे (30) हे 12106 विदर्भ एक्सप्रेसच्या एस-9 डब्यातून बर्थ नंबर 65 वरून भंडारा ते नाशिक असा प्रवास करीत होते. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावरून गाडी सुटली असता लोहापूलजवळ (मनपा पुल) ते रेल्वे दाराजवळ थांबून भ्रमणध्वनीवर बोलत होते. ते बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधून मोबाईल चोरांनी त्यांच्या हातातील भ्रमणध्वनी हिसकावून पळ काढला. धावती गाडी असल्याने फिर्यादी आरडा ओरड शिवाय दुसरे काहीच करू शकत नव्हते. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविला.
घटनेची गंभीरता लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा आणि लोहमार्ग नागपूर यांनी समांतर तपास केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोहापुल आउटरजवळून आरोपी रोहित उर्फ बावा वांद्रे (20), रा. जाटतरोडी, पवन ठाकुर (19), रा. कौशल्यायणनगर, संकल्प (18) या तिघांना अटक केले. तसेच एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता विदर्भ एक्सप्रेसमधून मोबाईल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच इतरही गाड्यात प्रवाशांचे मोबाईल लंपास केल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून 2 लाख 43 हजार रूपये किंमतीचे एकूण 14 मोबाईल जप्त केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, सुरेश राचलवार, महेंद्र मानकर, नामदेव शहारे, रवींद्र सावजी, चंद्रशेखर येळेकर, रविकांत इंगळे, श्रीकांत धोटे, राजेश पाली, विनोद खोब्रागडे, नलीनी भनारकर, अमोल हिंगणे, चंद्रशेखर मदनकर यांनी केली.
मोबाईल पळविणार्यांची टोळी गजाआड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com