Ø कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भरपाईबाबत बैठक
Ø 1 लाख 98 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
यवतमाळ :- खरीप 2023 या हंगामात शेतपिकांचे नुकसान झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे भरपाईचे दावे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नाकारले होते. याबाबत आ.डॅा.संदीप धुर्वे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ.डॅा.धुर्वे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. यामुळे जिल्ह्यातील 1 लाख 98 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होणार आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पिक विमा प्रलंबित दावे निकाली काढण्याबाबत मंत्रालयात आढावा सभा आयोजित करण्यात आली. सभेला आमदार डॉ. संदीप धुर्वे, कृषि विस्तार व प्रशिक्षण संचालक विनयकुमार आवटे, कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे तसेच रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील बैठकीला उपस्थित होते.
जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अधिकृत कंपनी आहे. कंपनीने खरीप 2023 मध्ये प्राप्त झालेल्या एकूण 6 लाख 23 हजार 921 नुकसानीच्या सूचनांपैकी 3 लाख 17 हजार 851 शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविले होते. या शेतकऱ्यांना कंपनीने 229 कोटी 26 लाख रुपयांची विमा भरपाई वाटप केली. उर्वरीत 3 लाख 6 हजार 50 शेतकऱ्यांना अपात्र ठरविले होते. याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या व बरेच शेतकरी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यलयात विचारणा करण्यास येत होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा हा मुद्दा कृषिमंत्र्यांकडे उपस्थित केला.
आर्णि विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 28 जून 2024 रोजी पत्र लिहून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहता प्रधान सचिव यांना जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय कायम ठेऊन शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्याविषयी आदेशित करण्याबाबत विनंती केली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे हा विषय आग्रहीपणे लावून धरला.
आ.डॅा.धुर्वे यांच्या प्रयत्नामुळे आर्णि विधानसभा मतदारसंघातील आर्णी, घाटंजी व पांढरकवडा तालुक्यातील 49 हजार 530 शेतकऱ्यांना 10 कोटी 86 लाख ईतकी विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 1 लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना 43 कोटी 66 लक्ष रुपये विम्यापोटी मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी कळविले आहे तसेच दि.३१ जुलैपूर्वी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.