नागपूर :- प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर नागपुरातील अनेक दिव्यांग खेळाडूंनी देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूर शहराला नावलौकिक मिळवून दिला आहेत. अशाच खेळाडूंपैकी काही खेळाडूंना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा साहित्य आणि आर्थिक सहायतेचा धनादेश प्रदान करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते दोन खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि एका खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आर्थिक सहायातेचा धनादेश प्रदान करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात शुक्रवार (ता.१०) रोजी झालेल्या छोटेखानी समारंभात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते या खेळाडूंना क्रीडा प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शासनाने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा लागू केला असून, सदर कायद्या अंतर्गत अपंगांसाठी किमान 3 टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत शासननाच्या निर्देशान्वये नागपूर महानगरपलिकेतर्फे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणा-या दिव्यांग खेळाडू आर्थिक योजने अंतर्गत मनपा क्षेत्रातील तीन दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या खेळाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात अभिषेक सुनिल ठवरे व संदिप गवई या दोन धनुर्विद्या खेळाच्या दिव्यांग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता आंतरराष्ट्रीय दर्जाचे धनुर्विद्या खेळाचे अत्याधुनिक क्रीडा साहित्य घेण्याकरीता सदर योजनेमधून प्रत्येकी 3 लाख रुपये मनपामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच निधी विनोद तरारे या दिव्यांग खेळाडूला ब्राझिल येथे होणाऱ्या डिप ऑलिम्पिक स्पर्धेकरीता दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणी करीता आर्थिक सहायतेचा रुपये 20 हजारचा धनादेश योजनेमधून देण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी पुढील वाटचालीकरिता खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.