नागपूर :- देशातील गरीब, महिला, युवा, अन्नदाता अर्थात शेतकरी यांचा सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशी विकास साधून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसीत भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून देशातील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, महिला, शेतकरी, युवा यांच्या उत्थानावर भर दिला आहे. देशातील शेतक-यांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे ४ कोटी शेतकरी लाभान्वित झालेले आहेत. यात आता पुढचे पाउल टाकत प्रधानमंत्री किसान सन्मान स्वनिधी योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या मत्स्य व्यवसायाला प्राधान्य देण्याची योजना तयार करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाचा वसा घेतलेल्या मोदी सरकारच्या १० वर्षाच्या कार्यकाळात ११.८ कोटी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना सुरू केली जाणार आहे.
शेतकरी आणि शेतीच्या उत्थानासोबतच शैक्षणिक बळकटीकरणाकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. देशात नविन वैद्यकीय महाविद्यालयांसह ७ नवे आयआयटी आणि ७ नवे आयआयएम सुरू करण्याचा दुरदृष्टी निर्णय सरकारने घेतलेला आहे. देशातील पर्यटन स्थळांच्या विकासाठी सरकारने विशेष तरतूद केल्याचा आनंद आहे. लक्षद्वीप टुरिझमकडे विशेष लक्ष देऊन भारतातील पर्यटन स्थळांचा विकास साध्य होणार आहे.
देशाची युवाशक्ती सशक्त करण्याकडे सरकारने विशेष लक्ष दिले आहे. युवकांच्या स्टार्टअपसाठी स्किल इंडिया मिशनच्या माध्यमातून १.४ कोटी युवकांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. व्यवसायांना बळ देण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत १० वर्षात ४३ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना घरे देण्यात आली. देश विकासाच्या प्रवाहात लहान शहरांना जोडून स्थानिक स्तरावर सर्वांगिण विकास व्हावा या अभिनव संकल्पनेतून लहान शहरांना जोडणारा ५१७ नवा रूट प्लॅन ‘उडाण’ स्कीम आणली जाणार आहे.
देशातील प्रत्येक वर्गाचा सर्वांगीण विकास करून त्यांना सशक्त बनवून देशाच्या बळकटीकरणाची दूरदृष्टी असलेला संकल्प ऐतिहासीक आणि पथदर्शी आहे.