नागपूर :- गरीब, महिला, युवा, शेतकरी या चार महत्वाच्या घटकांच्या विकास आणि उत्थानाची संकल्पना प्रत्यक्षात साकारून सामाजिक न्यायाच्या सर्वांगीण, सर्वस्पर्शी व सर्वसमावेशी संकल्पनेची पूर्ती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होत आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली सामाजिक न्यायाची संकल्पना ख-या अर्थाने पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.
देशातील गरीबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण ही जाणीव ठेवून सरकारने गरीबांच्या उत्थानासाठी सरकारने मागील १० वर्षात २५ कोटी नागरिकांना द्रारिद्यरेषेच्या बाहेर काढण्यासाठी कार्य केले. पीएम जनधन खाते, पीएम स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम जनमन योजना या आणि अशा कित्येक योजनांच्या माध्यमातून देशातील गरीबांना गरीबीची रेषा पार करून मुख्य प्रवाहात येण्याचे मार्ग सरकारने मोकळे केले आहेत.
महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय उत्थानातून त्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केलेले कार्य ऐतिहासिक आहेत. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून ३० कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सरकारद्वारे महिलांना प्राधान्य देत लागू करण्यात आलेल्या विविध योजनांमुळे आज देशात उच्च शिक्षणात महिलांचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशातील ग्रामिण भागात ७० टक्क्यांपेक्षा अधिक घरे महिलांना देण्यात आले आहेत. यात आता पुढे सुकन्या समृद्धी योजना, लखपती दिदी सारख्या योजनांमुळे महिलांच्या सशक्तीकरणास बळ मिळणार आहे.
देशाच्या अमृत काळातून सुवर्णकाळात विकसीत राष्ट्राच्या उभारणीत युवाशक्तीचे मोठे योगदान असणार आहे. या युवाशक्तीला अधिक बळकट करण्याकडे नरेंद्र मोदी सरकाने विशेष लक्ष दिले आहे. स्कील इंडिया मिशनद्वारे १.४ कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरुणांच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्या कौशल्यात वृद्धी व्हावी यासाठी ३००० नवीन आयटीआय, ७ नवीन आयआयटी, ७ नवीन आयआयएम, १५ एम्स अणि ३९० विद्यापीठ अशा उच्च शिक्षणाच्या संस्थांची मोठ्या प्रमाणात उभारणी होणे हे विकसीत भारतातील ऐतिहासीक बाब आहे.
देशाचे अन्नदाता शेतक-यांच्या उत्थानासाठी महत्वाचे पाउल अर्थसंकल्पात उचलण्यात आले आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ थेट शेतक-यांच्या खात्यात पोहोचणार असून ही बाब सुखावह आहे. पीएम पीक विमा योजनेमुळे शेतक-यांच्या पिकांना संरक्षण प्राप्त झाले आहे.