संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठीत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी 14 व 15 मे या दोन दिवसीय तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी ता प्र 15 – केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाद्वारे दिव्यांगासाठी एडीआयपी योजना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नागपूर चे समाज कल्याण विभाग,जिल्हा आरोग्य विभाग , एएलआयएमसीओ कानपुर व सीआरसी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी 29 एप्रिल ते 27 मे 2022 पर्यंत राबवित येत असलेल्या मोफत सहाय्यक साधने वाटप कार्यक्रमा अंतर्गत कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील एमटीडीसी सभागृहात 14 व 15 मे ला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवसीय तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून हजारोच्या वर संख्येतील लाभार्थ्यांनी या दोन दिवसीय तपासणी शिबिराचा लाभ घेतला तर हे शिबिर केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत होत असल्याच्या नावाखाली भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने जणू या शिबिरात भाजपचाच मेळावा भरला की काय?असे चित्र निर्माण झाले होते तर या तुलनेत कांग्रेसच्या बोटावर मोजणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवून जवाबदारी पार पाडल्याचा देखावा केला. या शिबिरात दिव्यांग लाभार्थी तसेच 60 वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करून या दोन दिवसीय शिबिराचा पुरेपूर लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.याप्रसंगी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर, जी प सदस्य प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे, जी प सदस्य मोहन माकडे, माजी जी प सदस्य अनिल निधान, कामठी पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंशुजाताई गराटे, सहाय्यक गटविकास अधिकारी गायगोले, पंचायत समिती अधिकारी वर्ग सह तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी, केम ग्रा प उपसरपंच अतुल बाळबुधे, लाला खंडेलवाल, उज्वल रायबोले, राजा देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थ्याना पुढच्या टप्प्यात मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यात येणार आहेत. यानुसार दिव्यांगांना
–चालण्यासाठी काठी, श्रवणयंत्र, व्हील चेअर, कॉलीपर्स, शैक्षणिक संच, स्मार्ट फोन(दृष्टिहीन करिता),संडास खुर्ची, कुबडी, तीनचाकी खुर्ची, बॅटरीवाली ट्रायसायकल, , कृत्रिम अवयव, ब्रोल कोट, स्मार्ट केन(दृष्टीहीनकरिता)चा लाभ देण्यात येणार आहे तसेच वयोश्री योजनेच्या लाभार्थ्याना चालण्यासाठी काठी, श्रवणयंत्र, दाताची कवठी, कमरेचा पट्टा, चष्मा, कुबडी, तीनचाकी खुर्ची, संडास खुर्ची, कमरेचा पट्टा देण्यात येणार आहे.
हे दोन दिवसीय तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडला असून या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद नागपूर चे समाज कल्याण व आरोग्य विभागासह कामठी पंचायत समिती तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने मोलाची भूमिका साकारली.