संदीप कांबळे, कामठी
– केंद्रस्तरीय बाल व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन
मौदा (ताप्र) : आयोजित शिबिरातून अवगत झालेली गुणात्मक कला तीन दिवसांपूर्ती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनो जिवणात उतरवा असे आवाहन मौदा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी आशा गणवीर यांनी केले. तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच मनोरंजनातून मुलं शिकते करण्याच्या दृष्टीने केंद्रस्तरीय बाल व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आजनगांव केंद्रप्रमुख डॉ. शिल्पा सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शिबिराचे उदिष्ट् विषद केले.
मौदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धामनगांव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय बाल व्यक्तिमत्त्व या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सोहळा दि.५ मे रोजी पं.स. गटशिक्षणाधिकारी आशा गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या शिबिरांतर्गत आनापान क्रिया, योगा, चित्रकला, आत्मसंरक्षण, झुंबा, पर्यावरण संस्कार, प्रश्न मंजुषा, वर्तमानपत्र वेषभूषा, बौध्दिक व कला-विज्ञान यावर मार्गदर्शन लाभणार आहे.
शिबिराची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने गटशिक्षणाधिकारी आशा गणवीर, केंद्र प्रमुख डॉ. शिल्पा सुर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता मोटघरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका प्रमुख तुकाराम लुटे, शिक्षक प्रदिप हजारे, ज्योती नांदगाये, वसंत पत्रे, कलावती करंडे, खोब्रागडे, गायकवाड, संदीप चौधरी, घोडेस्वार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन महेंद्र हेडाऊ यांनी तर आभारप्रदर्शन शिबिर प्रमुख दिनेश ढोबळे यांनी केले.