रामटेक वारसा स्थळे पाहणी फेरी उत्साहात
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अनोखा उपक्रम
रामटेक : रामटेक या महाकवी कालिदास यांच्या भूमीत आज एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकाराने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कालिदास स्मारकस्थळी विशेष कार्यक्रम आणि रामटेक येथील ऐतिहासिक स्थळांच्या पाहणी फेरीचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले. त्यात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उत्साहात सहभागी झाले होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा गौरव दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी भाषा गौरव सोहळा आणि रामटेक वारसा स्थळांना भेटी यांचा समावेश होता. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, आमदार अॅड. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी आर.विमला, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, उपविभागीय अधिकारी वंदना सारंगपते, पर्यटनमित्र चंद्रपाल चौकसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या, मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रभावी वापरासाठी शासनाचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. राजभाषा अधिनियमानुसार शासन व्यवहारात मराठीचा वापर वाढवण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा विभागाची जबाबदारी सांभाळताना मुंबईत भाषा भवन उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही त्यांनी यावेळी माहिती दिली. रामटेकच्या विकासासाठी कालिदास स्मारक समिती, संस्कृत विद्यापीठ, नगर परिषद आणि प्रशासन यांच्या समन्वयाने प्राधान्याने प्रयत्न केले जातील. यासोबतच पर्यटन स्थळ म्हणूनही रामटेकचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठीही आपले प्रयत्न असतील, अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले.
मराठी भाषेच्या गौरवासाठी असे कृतिशील उपक्रम होणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती विमला म्हणाल्या,
महाकवी कालिदास यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम होणे आणि अभिजात मराठी भाषेच्या संदर्भात कालिदासांच्या लेखनात विशेष उल्लेख असणे महत्त्वाचे आहे. या स्मारकाचा विकास व देखभाल करण्यासाठी प्रशासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
आमदार जयस्वाल म्हणाले, कालिदासांच्या स्मृती हा रामटेकचा अतिशय अभिमानास्पद आणि मौल्यवान असा ठेवा असून रामटेकच्या परिपूर्ण विकासासाठी प्रशासनाच्या सहयोगाने प्रयत्न केले जातील. पर्यटन, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मनोरंजनात्मक अशा विविध दृष्टिकोनातून हा विकास घडावा यासाठी तसेच महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीसाठी आमचे प्रयत्न आहेत.
कालिदासाच्या भूमीत मराठी भाषेचा गौरव सोहळा आयोजित होणे हे अत्यंत औचित्यपूर्ण असल्याचे सांगताना संचालक हेमराज बागुल म्हणाले, भाषा हा संस्कृतीचा हुंकार असतो त्यामुळे भाषेचे संवर्धन म्हणजे संस्कृतीचे संवर्धन. जीवनाच्या विविध क्षेत्रात भाषेचा गुणवत्तापूर्ण वापर वाढल्यास तिचा खरा विकास होऊ शकेल. त्यासाठी भाषा संवर्धन हा केवळ शासकीय उपक्रम न राहता ती एक व्यापक जनभावना निर्माण व्हावी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वय अधिकारी अनिल गडेकर यांनी केले तर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आभार मानले.
रामटेक वारसास्थळे पाहणी फेरी
तत्पूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील कार्यालयांमार्फत रामटेक वारसास्थळे पाहणी फेरीचेही आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आर. विमला व आमदार आशिष जायस्वाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. महासंचालनालयाचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. अंबाडा तलावापासून सुरु झालेल्या या फेरीमध्ये कालिदास स्मारक, मेघदूत गॅलरी, रुद्र नरसिंह, केवल नरसिंह, राम मंदिर, कपूर बावडी, जैन मंदिर या ऐतिहासिक स्थळांची पाहणी करण्यात आली.
निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के, पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगळे, रामटेक नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वंजारी , माहिती समन्वयक अनिल गडेकर, मराठी भाषा विभागाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी, चेरी फॉर्मचे अमोल खंते, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, राकेश मरजीवे यांच्यासह महसूल, माहिती व जनसंपर्क, मराठी भाषा विभाग, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.